मुंबई : भर रस्त्यात महिलांना पाहून अश्लील वर्तन करणाऱ्या विकृताला एका तरुणीनेच चांगलाच धडा शिकवला. तिने मित्राच्या मदतीने या विकृताला पकडून चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.

दहिसर येथे वास्तव्यास असलेली २५ वर्षीय तरुणी एका खासगी कंपनीत काम करते. दररोज सकाळी ती ७.३० च्या सुमारास कार्यालयात जाण्यासाठी रेल्वे स्थानक गाठते. रेल्वे स्थानकावर जाणारा रस्ता निर्मनुष्य असून तेथे वाहने उभी असतात. काही दिवसांपूर्वी सकाळी या रस्त्यावरून जात असताना तिच्याकडे पाहून एक तरुण अश्लील कृत्य करीत होता.

ती त्याच्याकडे दुर्लक्ष करून निघून गेली. संध्याकाळी घरी परतल्यावर हा प्रकार तिने आपल्या पालकांना सांगितला. तिच्या पालकांनीही याकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला. काही दिवसांनी पुन्हा तसाच प्रकार घडला. तोच विकृत तरुण तिच्यासमोर येऊन अश्लील कृत्य करीत होता. ही तरुणी या प्रकारामुळे प्रचंड संतापली. त्याला जाब विचारला असल्यास तो हल्ला करण्याची शक्यता होती. त्यामुळे ती तडक तेथून निघून गेली.

असा रचला सापळा…

दोन वेळा असा प्रकार झाल्याने ही तरूणी संतापली होती. तिला पालकांनी रस्ता बदलून जाण्याचा सल्ला दिला. मात्र तिने या विकृताला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तिने आपल्या एका मित्राची मदत घेतली. त्याला रंगेहाथ पकडून चोप देण्याचे दोघांनी ठरवले. त्यानुसार त्या ठिकाणी त्यांनी सापळा रचण्याचे ठरवले. दररोज सकाळी कामावर जाताना तिचा मित्र लांबून आडोशाला उभा राहून पाळत ठेवत होता. दोन दिवस तो विकृत तरुण दिसला नाही. तिसऱ्या दिवशी तरूणी सकाळी ७.४५ च्या सुमारास त्याच रस्त्याने निघाली होती. ठरलेल्या योजनेप्रमाणे लांबून तिचा मित्र पाळत ठेवून होता. ही तरुणी येताना पाहून त्या विकृताने पुन्हा अश्लील कृत्य करण्यास सुरवात केली. इतक्यात तिच्या मित्राने झ़डप घालून त्याला पकडले. दोघांनी त्याला चोप दिला. योगायोगाने त्याच वेळी तेथून पोलिसांची गस्तीची गाडी जात होती. त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

किरण पाडेकर (२८) असे या विकृत तरुणाचे नाव आहे. तो गाडीचालक आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या महिलांना पाहून अशी अश्लील कृत्ये करीत असल्याची माहिती दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी दिली.

तणावात असल्याने असे कृत्य केल्याची कबुली त्याने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्याविरोधात सार्वजनिक ठिकाणी महिलांना उद्देशून अश्लील कृत्य करणे, पाठलाग करणे आदींसाठी भारतीय न्याय संहितेच्या कलम ७५, ७८ आणि ७९ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन महिन्यांत तिसरा विकृत अटकेत

रस्त्यात महिलांना पाहून अश्लील कृत्य करणाऱ्या विकृतांचे प्रमाण वाढत आहे. मागील दोन महिन्यांतील हा तिसरा प्रकार आहे. या तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.