मॉडेल तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेले पोलीस उपमहानिरीक्षक सुनील पारसकर यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात यावे, अशी मागणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन मेहता यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. या प्रकरणी सुरू असलेली चौकशी पारदर्शी नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.
पारसकर यांच्यावर बलात्कार व विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. महिला अत्याचार विरोधी कक्षातर्फे या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या चौकशीचा तपशील कळविण्याची मागणी आयोगाने पोलीस उपायुक्तांकडे केली होती. मात्र, माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे आयोगाने सोमवारी थेट आयुक्तांनाच पत्र पाठवले. यापूर्वीच पारसकर यांनी पायउतार व्हायला हवे होते. पण किमान चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना निलंबित करा अशी मागणी शहा यांनी या पत्रात केली आहे. या प्रकरणाची चौकशी सर्वसामान्य जनतेत विश्वास निर्माण करणारी नाही, तसेच ती पारदर्शीही नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. हृदयरोगाचे कारण देत बायपास सर्जरीला नकार देणाऱ्या पारसकरांची सरकारी डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या, असेही शहा या पत्रात म्हटले आहे. एका आयपीएस अधिकाऱ्याविरोधात तक्रार देण्याचे धाडस करणाऱ्या महिलेमागे सर्वानीच पाठीशी उभे रहायला हवे असेही शहा यांनी म्हटले आहे.
मॉडेलचा वकील उलटला
तक्रारदार मॉडेलचे पहिले वकील रिझवान सिद्दिकी तिच्यावरच उलटले आहेत.या मॉडेलने माझ्यापासून बऱ्याच गोष्टी लपवून ठेवल्यामुळे आपण तिचे वकीलपत्र सोडल्याचा दावा सिद्दिकी यांनी सोमवारी पोलिसांकडे केला. मॉडेलने बलात्कार झाल्याचे माझ्यापासून लपवून ठेवले होते तसेच पारसकर यांनी मॉडेलला कधी पैसे देऊ केले नव्हते, असे त्याने पोलिसांना सांगितले. मॉडेलने सुरुवातीला जी माहिती मला दिली त्यावरून मी नोटीस पाठविली होती, पण तिने माझी दिशाभूल केल्याचे सिद्दिकी यांचे म्हणणे आहे.



