मुंबई : जेवणावर ७५ रुपयांचे सेवा शुल्क आकारणाऱ्या माहीम येथील ‘थंगाबली’ हॉटेलविरोधात प्रभादेवी येथील ३४ वर्षीय महिलेने जिल्हा ग्राहक न्यायालयात धाव घेतली. ग्राहक न्यायालयानेही तिच्या तक्रारीची दखल घेऊन हॉटेलला नोटीस बजावली असून तक्रारीवर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. 

प्रभादेवीतील रिधिना नागवेकर यांनी वकील प्रशांत नायक यांच्यामार्फत जिल्हा ग्राहक न्यायालयात हॉटेलविरोधात तक्रार दाखल केली आहे. नागवेकर यांच्या तक्रारीनुसार, ३० जानेवारी २०२१ रोजी त्या ‘थंगाबली’ हॉटेलमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी सेवा शुल्क आकारण्याबाबत  हॉटेलच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधून आक्षेप नोंदवला होता. तसेच सेवा शुल्क देणे ऐच्छिक असून मूळ देयकासह ग्राहकांकडून ते अनिवार्य म्हणून आकारले जाऊ नये, असेही त्याला समजावले होते. परंतु त्यानंतरही सेवा शुल्क भरण्यास भाग पाडले. दुसऱ्या दिवशी हॉटेल व्यवस्थापनाला वकिलामार्फत बेकायदा कृतीचे स्पष्टीकरण देण्याची मागणी करणारा ई-मेल पाठवला. मात्र, हॉटेल व्यवस्थापनाकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही. त्यामुळे ग्राहक न्यायालयात धाव घेऊन तक्रार नोंदवल्याचे नागवेकर तक्रारीत म्हटले आहे.

हॉटेलने  परतावा व्याजासह परत करण्याचे आदेश द्यावेत. शिवाय हॉटेलच्या कृतीमुळे झालेल्या मानसिक त्रासाची भरपाई म्हणून २० लाख रुपयांची भरपाई देण्याची मागणी नागवेकर यांनी केली आहे.

हॉटेल शुल्क आकारण्यास मज्जाव..

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने सोमवारीच हॉटेल्स आणि रेस्टॉरंटना जेवणाच्या शुल्कांमध्ये सेवा शुल्क आकारण्यापासून मज्जाव केला होता. शिवाय या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंटविरोधात ग्राहकांनी थेट ग्राहक न्यायालयांत किंवा ई-दाखिलह्णद्वारे तक्रार करण्याचे स्पष्ट केले होते. एवढेच नव्हे, तर याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडेही याप्रकरणी तक्रार दाखल करण्यास प्राधिकरणाने मुभा दिली आहे.