अहमदनगर येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार व हत्येच्या प्रकरणावरून राज्यभरात संताप व्यक्त होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र विधानसभेत मंगळवारी आकडेवारीचा खेळ करीत बलात्कार, मुलांचे लैंगिक शोषण या घटनांची टक्केवारी कमी होत असल्याचा दावा केला. मात्र न्यायालयांचे निर्णय, बलात्काराच्या गुन्ह्य़ाच्या व्याख्येची व्याप्ती वाढविल्याने आणि महिला आता गुन्हे नोंदविण्यास पुढे येऊ लागल्याने संख्या वाढत असल्याचे सांगत बलात्काराचे गुन्हे न्यायालयात सिद्ध होण्याचे प्रमाण २१.२ टक्क्यांवर गेल्याचे त्यांनी सांगितले. ओळखीच्याच व्यक्तींकडून बलात्कार होत असल्याचे प्रमाण ९० टक्क्यांहून अधिक असल्याचा दावा करीत कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती चांगली असल्याचे स्पष्ट केले.

बलात्काराच्या गुन्ह्य़ांपैकी बरेच गुन्हे हे लग्नाचे आमिष दाखवून जबरीने किंवा सहमतीने शारीरिक संबंध ठेवल्याच्या प्रकरणातील असतात. जेव्हा न्यायालयात खटला उभा राहतो, तोपर्यंत तडजोड झालेली असते. निर्भया प्रकरणानंतर बलात्काराच्या व्याख्येची व्याप्ती वाढविल्याने गंभीर स्वरूपाची छेडछाड किंवा विनयभंगाचे गुन्हेही बलात्काराअंतर्गत दाखल होतात. त्याचबरोबर समाजात बदनामीच्या भीतीने बलात्कार व बालकांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी महिला पुढे येत नसत. पण आता हे गुन्हे नोंदविण्यासाठी लोक पुढे येऊ लागले आहेत. पण अल्पवयीन बालकांवरचे अत्याचार, सामूहिक बलात्कार यांचे गुन्हे कमी होत असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

  • साधारणपणे ९० टक्क्यांहून अधिक प्रकरणात ओळखीच्याच व्यक्तींकडून बलात्कार होतात, असे आकडेवारीवरून दिसून येते.
  • २०१५ मध्ये नोंदल्या गेलेल्या ५१८८ गुन्ह्य़ांपैकी २०४ प्रकरणांमध्ये आरोपी हे अनोळखी होते, ४९८४ गुन्हे हे ओळखीच्याच व्यक्तींकडून झाले, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.