मुंबई : जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर शेकडो महिला प्रवाशांनी सोमवारी धावत्या लोकलमध्ये योगाभ्यास केला. पश्चिम रेल्वेवरील विरारहून चर्चगेट जाणाऱ्या महिला विशेष लोकलमध्ये १८ योग शिक्षिकांसह महिला रेल्वे प्रवासी, महिला रेल्वे कर्मचाऱ्यांनी योगाची विविध प्रकारांचे प्रात्यक्षिके सादर केली.
पश्चिम रेल्वे आणि एका खासगी योग संस्थेतर्फे जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी महिला विशेष लोकलमध्ये योगाभ्यास करण्यात आला. या योगाभ्यासाला बोरिवलीपासून सुरुवात झाली.
लोकल सकाळी १०.२२ वाजता बोरिवली स्थानकात आली असता, योगशिक्षक लोकलमध्ये चढले. त्यानंतर शेकडो महिला प्रवाशांनी लोकलमध्ये उभे राहून, आसनावर बसून योगासनाची प्रात्याक्षिके केली.

सहज – सोपे योगासने यावेळी महिलांकडून करून घेण्यात आली. योग शिक्षकांनी महिला प्रवाशांना साध्या सूक्ष्म स्ट्रेच, महिला-केंद्रित मुद्रा, खोल श्वासोच्छवास, सहज श्वास घेण्याचे व्यायाम, गुणगुणणे, ध्यान, टाळ्या वाजवणे आणि हास्य व्यायामाद्वारे मार्गदर्शन केले. जे लोकल प्रवासादरम्यान बसून करता येतात. महिला प्रवाशांनी देखील स्वतःच्या बॅगा, पर्स आणि मोबाइल बाजूला सारून त्यात सहभाग घेतला.

गेल्या ९ वर्षांपासून ‘प्रवासाचा वेळ, योग वेळ’ या मोहिमेचा प्रचार करण्यात येत आहे. ज्यामुळे प्रवाशांना बसून करता येणाऱ्या सोप्या योगभ्यासांद्वारे प्रवासाच्या वेळेचा सर्वोत्तम वापर करण्यास प्रोत्साहित केले जाते. पश्चिम रेल्वेने दिलेल्या प्रोत्साहन आणि पाठिंब्यामुळे या उपक्रमाला वर्षानुवर्षे चांगला प्रतिसाद मिळत आहे. १८ योगशिक्षकांपैकी प्रत्येकी तीन शिक्षक सहा डब्यात जाऊन, एकाचवेळी योगभ्यास शिकवला. बोरिवली ते वांद्रे लोकल प्रवासात प्रचंड गर्दीत सर्व महिलांनी सहकार्य केले. तसेच महिला प्रवाशांनी या उपक्रमाचे कौतुक केले, असे योग शिक्षिका रुचिता शाह यांनी सांगितले.
