प्रकाशाचे वाक्य
डेंग्यूचे निमित्त झाले आणि ‘ती’ची दृष्टी दिवसेंदिवस क्षीण होत गेली. इतकी की, तिला काहीही दिसेनासे झाले. डोळ्यांसमोर उरली फक्त एक भयाण पोकळी.. अंधाराने काठोकाठ भरलेली. तो दिवस होता ७ ऑक्टोबर, २०१४ ऑक्टोबर. दृष्टी गेली. पण, अनघा मोडक हिच्या संघर्षांला खरी धार आली. कारण, या अंधारातही तिने निग्रहाने लेखन, निवेदन हा आपला प्रवास सुरूच ठेवला. अंधाराच्या पूर्णविरामानंतरही प्रकाशाच्या वाक्याने नवी सुरुवात करू पाहणारी अनघा वेगळी ठरते ती त्यासाठीच!
रुपारेल महाविद्यालयात शिकणाऱ्या अनघाला लहानपणापासूनच लिखाणाची प्रचंड आवड. सतत कविता, संहिता, संवाद, निवेदन लिहून काढण्याची आणि त्या सादर करण्याची तिची धडपड अनेकांच्या कुतूहलाचा विषय असे. नवनवीन कला शिकण्याचा ध्यास घेऊन सतत पुढे जात राहणारी अनघा अचानक एके दिवशी डेंग्यूच्या तापाने आजारी पडली. तिच्या दृष्टीवर परिणाम झाला. पांढऱ्यावर काळ्या अक्षरांची नक्षी रेखाटण्यात रंगणाऱ्या अनघाच्या आयुष्यात फक्त काळा रंग पसरला. आयुष्य इतक्या उत्स्फूर्तपणे जगणारी एखादी व्यक्ती या आघाताने खचून गेली नसती तर नवलच. अनघाच्या प्रवासाला काळोखाने पूर्णविराम दिला. पण, या पूर्णविरामानंतरही नवे वाक्य सुरू करून आयुष्यात प्रकाश पसरविता येतो हे ती विसरली नाही. तिचा संघर्ष सुरूच राहिला. ती यातून सावरत असतानाच अनघाच्या वडिलांनी जगाचा निरोप घेतला.
अशाही परिस्थितीत प्रचंड जिद्द गाठीशी असलेल्या अनघाला जोशी सरांनी प्रवास पुन्हा सुरू करण्याची ताकद मिळवून दिली. ‘सध्या तुझा आतला प्रवास सुरू आहे. तुझी ध्यान करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. एकदा का आतला प्रवास झाला ही बाहेरचा प्रवास अगदी सोपा असतो,’ हा आयुष्याचा गुरुमंत्र आत्मसात करून अनघा आत्मविश्वासाने आतला आणि बाहेरचा असा दोन्हीकडचा प्रवास आत्मविश्वासाने करते आहे.
मराठी वाङ्मयात बी.ए. त्यानंतर पुणे विद्यापीठातून पत्रकारितेची पदविका, छायाचित्रणाची पदविका, जनसंज्ञापन आणि पत्रकारिता विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेली अनघा निवेदन करते. याच जोडीला आकाशवाणीवर रेकॉर्डिगही करते. या प्रवासात तिला अनुराधा गोरे, डॉ. अनघा मांडवकर, शोभा कुद्रे, माधवराव, कमलेश भडकमकर, विनोद पवार, महेंद्र पवार यांचे मोलाचे प्रोत्साहन लाभले. याशिवाय आई, भाऊ, आत्या, मामा या तिच्या नातेवाईकांनीही तिचा धीर खचू दिले नाही. माणसाने नदीसारखे जगावे. सतत पुढे चालत राहावे. एका ठिकाणी थांबलो की आपले तळे होते, हे सांगायला ती विसरत नाही.
गेल्या चोवीस वर्षांपर्यंत मला सगळ्या गोष्टी पाहता येत होत्या. त्या वेळी मला अनेक रंग आवडत. विशेषत: काळा आणि पांढरा. आता काळा रंग माझ्यासोबत आहे. मात्र प्रकाशाचा रंग म्हणून ओळखला जाणारा पांढरा रंग लवकरच दिसेल याची मला खात्री आहे.
– अनघा मोडक

 

Untitled-3

डोळसांनाही जगण्याची दृष्टी
बालपणी अचानक आलेल्या अंधत्वावर मात करत आपले शिक्षण पूर्ण करून विविध क्रीडा प्रकारांमध्ये नुसते प्रावीण्यच नव्हे तर विश्वविक्रम करणाऱ्या नेहा पावसकर यांनी नुकतेच हरिश्चंद्र गडाचा भाग असलेल्या कोकणकडय़ावर १२०० फूट उंचीवरून व्हॅली क्रॉसिंग करण्याचा विक्रम केला. बुद्धिबळ, पोहण्याबरोबरच गिर्यारोहणासारख्या साहसी खेळांची आवड जोपासणाऱ्या नेहा यांनी या आधीही कुलु-मनाली येथील ‘क्षितीधर’ हे सुमारे १७ हजार २२० फूट उंचीचे शिखर सर करण्याचा विक्रम केला असून त्याची नोंद ‘लिम्का बुक’मध्ये झाली आहे. अंध असूनही त्यांनी केलेल्या या कामगिरीने डोळसांनाही जगण्याची एक दृष्टी मिळाली आहे.
दुसरीत असताना नेहा यांना अचानक अंधत्व आले. परंतु, त्यामुळे डगमगून न जाता कॅसेट व रीडरच्या साहाय्याने त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. इतकेच नव्हे तर घरच्यांच्या सहकार्यामुळे त्यांनी विविध खेळांमध्ये नैपुण्यही मिळवले. आपल्या अंधत्वावर मात करत जलतरण, बुद्धिबळ, गिर्यारोहण, अ‍ॅथलेटिक्स, कबड्डी, ज्युडो इत्यादी खेळांमध्ये त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली.
मुंबई येथील विक्रीकर कार्यालयात टेलीफोन ऑपरेटर म्हणून गेली २५ वर्षे काम करत असलेल्या नेहा यांनी आपल्या अंधत्वाला न घाबरता गिर्यारोहण तसेच निरनिराळ्या साहसी खेळांची विशेष आवड जोपासली. क्षितीधर, कोकणकडा याबरोबरच पुण्यामधील ‘डय़ुक्स नोज’ पर्वत रोपद्वारे सर करण्याचा विश्वविक्रमही त्यांच्या नावावर आहे. याशिवाय बुद्धिबळ खेळातही त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश मिळवत ११८९ इतके रेटिंग मिळविले आहे. जलतरणामध्ये त्यांनी आतापर्यंत राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धामध्ये यश मिळवले आहे. त्यांच्या या कामगिरीबद्द्ल २००५ मध्ये राज्य सरकारच्या शिवछत्रपती पुरस्काराने तर २०१० मध्ये राष्ट्रपती पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले. स्वत: खेळाडू म्हणून विविध खेळ खेळणाऱ्या नेहा यांनी अनेकींना खेळांचे प्रशिक्षणही दिले आहे. यासाठी त्यांनी २००३ मध्ये ‘ऑल इंडिया अंध स्त्रीहित असोशिएशन’ या संस्थेची स्थापना करून अनेक अंध महिलांना कबड्डी, बुद्धिबळ, कराटे, मल्लखांब, गिर्यारोहण, अ‍ॅथलेटिक्स अशा विविध खेळांचे प्रशिक्षणही त्या देत आहेत.
माझे पती पाहू शकतात, त्यांच्याच दृष्टीने मी पाहते. माझे वडील व पती यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच मी हे यश मिळवू शकले आहे. स्वत:ला कमी न लेखता आत्मविश्वासाने जगात वावरल्यास काहीही अशक्य नसते. अंध महिलांनी त्यांच्यातील न्यूनत्वावर मात करून विविध खेळांमध्ये यश मिळवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून असे प्रशिक्षण अनेकींना देत आहोत. तसेच अंध महिलांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करता यावेत यासाठीही सध्या प्रयत्नशील आहोत.
-नेहा पावसकर

 

Untitled-2

आधुनिक दुर्गा
जातपंचायतीत पुरुषप्रधान मानसिकतेविरुद्ध बंड पुकारणारी, कुटुंबाला बहिष्कृत केल्यानंतरही नेटाने उभी राहणारी, महाराष्ट्रातील वैदू समाजातील २८ लाख लोकांना संघटित करणारी दुर्गा गुडीलू. समाजातील दुष्ट रूढीप्रथांच्या संहारासाठी लढणाऱ्या या आधुनिक दुर्गेचं खरं रूप पाहायचं असेल तर ते मुंबईतील वैदू समाजाच्या वस्त्यांना भेट द्यावी लागेल.
भटक्या-विमुक्त जमातीतील वैदू समाज आजही मुख्य प्रवाहापासून वंचित राहिला आहे. संविधानात भटक्या-विमुक्तांसाठी कायदेशीर तरतूद असतानादेखील ते शिक्षणासारख्या मूलभूत हक्कांपासून वंचित आहेत. ४० टक्के वैदू समाज खोटय़ा औषधांचा व्यवसाय करीत आहेत. समाज सुधारण्यासाठी शिक्षण हाच उपाय आहे. हे लक्षात घेऊन ‘महाराष्ट्र वैदू समाज संघटने’च्या माध्यमातून दुर्गा मुंबईतील १३ वैदू समाजाच्या वस्त्यांसह महाराष्ट्रभरातील ६४ ठिकाणी काम करीत आहे.
दुर्गाच्या या संघर्षांची सुरुवात घरापासूनच झाली. तिच्या मोठय़ा बहिणीचे लग्न ती गर्भात असतानाच त्यांच्या समाजातील एका मुलाशी ठरले होते. मात्र वैदू समाजातील पहिली उच्चशिक्षित असलेल्या दुर्गाच्या बहिणीने गोविंदीने वयात आल्यानंतर या लग्नाला नकार दिला. जातपंचायतीच्या निर्णयाला डावलल्यामुळे दुर्गाच्या कुटुंबाला बहिष्कृत करण्यात आले होते. मात्र जातपंचायतीच्या अन्यायकारक निर्णयाला दुर्गाचा विरोध होता. या जातपंचायतीत स्त्रियांना आपली बाजू मांडण्याचा अधिकार नव्हता. सर्वच निर्णय हे स्त्रियांच्या विरोधातच दिले जात होते. कित्येकदा उकळत्या तेलात हात घालून स्त्रियांना आपली सत्यता पटवून द्यावी लागत होती. अवाच्या सवा दंड आकारून जातपंचायत पैसे उकळत होते. या रूढींविरोधात दुर्गाने मोठे आंदोलन छेडले. तिच्या पुढाकाराने वैदू समाजातील जातपंचायती बरखास्त करण्यात आल्या. समाजातील बनावट औषधांचा व्यवसाय, स्त्रियांना मिळणारे दुय्यम स्थान यावर तिचा विरोध आहे. तिच्या या कामाची दखल वयाच्या १४ व्या वर्षी ब्राझीलमधल्या ‘जागतिक सामाजिक परिषदे’नेही घेतली. या परिषदेत भारतातून निवडण्यात आलेल्या ४ मुलींपैकी महाराष्ट्रातून दुर्गाचा समावेश होता. तिथे तिने भटक्या व विमुक्त जमातीतील मुलांच्या समस्या मांडल्या. आता समाजातील एकही मुलगा-मुलगी शाळाबाह्य़ राहणार नाही यासाठी ती लढते आहे.
झाडाची फांदी तुटायला आली तरी त्यावर बसून आकाशाचे वेध घेणाऱ्या पक्ष्याला पडण्याची भीती कधीच नसते. कारण, त्याचा स्वत:च्या पंखांवर विश्वास असतो.. प्रतिकूल परिस्थितीत आपल्या वैदू समाजातील मागासलेपणा दूर करण्यासाठी झगडणारी दुर्गा, वयाच्या २४व्या वर्षी आजारणामुळे अंधत्व येऊनही जगण्यातली ऊर्मी न गमावलेली अनघा आणि आयुष्यातल्या काळोखावर मात करून आपल्याबरोबर इतरही अंध महिलांना क्रीडा क्षेत्रात निपुण करण्यासाठी झटणाऱ्या नेहा.. या तिघींचाही आपल्या पंखातील बळावर पूर्ण विश्वास आहे. म्हणूनच कोणतीही प्रतिकूल उद्भवली तरी किंवा शरीराने मर्यादा आणल्या तरी, त्या झेप घ्यायच्या राहत नाहीत. त्यांच्या या कर्तृत्वाला ‘जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने
‘मुंबई वृत्तान्त’चा सलाम.
जातपंचायतींमुळे समाजपरंपरेच्या बंधनातून मुक्त झाला. मात्र खरी समस्या ही येथील पुरुषी मानसिकतेची आहे. कारण, इतक्या वर्षांच्या लढय़ानंतरही ही मानसिकता बदललेली नाही. ती बदलायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. म्हणून येत्या जूनपर्यंत वैदू समाजातील एकही मूल शाळाबाह्य़ राहणार नाही, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.
– दुर्गा गुडीलू

 

संकलन- मीनल गांगुर्डे, विवेक सुर्वे, प्रसाद हावळे