work Bullet Train project Railway Minister Ashwini Vaishnav announces retendering stations Mumbai ysh 95 | Loksatta

बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला गती; मुंबईतील स्थानकांसाठी फेरनिविदा, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा

बहुचर्चित मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मुंबईमधील खीळ बसलेल्या कामांना केंद्र आणि राज्य सरकारने आता गती देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

bullet-train
( संग्रहित छायचित्र )

मुंबई : बहुचर्चित मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मुंबईमधील खीळ बसलेल्या कामांना केंद्र आणि राज्य सरकारने आता गती देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. वांद्रे – कुर्ला संकुलातील  स्थानकाचा आराखडा, बांधकाम, तसेच २१ किलोमीटरच्या भुयारी मार्गासाठी फेरनिविदा मागवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाजमाध्यमाद्वारे दिली. नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने या दोन्ही कामांच्या निविदा रद्द केल्या होत्या.

बुलेट ट्रेनचे मुंबईतील प्रारंभीचे स्थानक वांद्रे-कुर्ला संकुल येथे होणार असून ते भुयारी आहे. हे स्थानक ४.९० हेक्टर जागेत उभारण्यात येणार असून त्यासाठी एक हजार ८०० कोटी खर्च अपेक्षित आहे. १६ बुलेट ट्रेनसाठी सहा फलाट आणि सुविधांसह आकर्षक असे हे  स्थानक असेल. या कामांसाठी १८ फेब्रुवारी २०२१ रोजी निविदा काढण्यात येणार होती, परंतु स्थानकाच्या जागेवर करोना केंद्र उभारण्यात आले होते. तसेच त्याच्या जवळच एक पेट्रोल पंप होता. त्यामुळे निविदा खुली करण्यास विलंब झाला आणि निविदेला ११ पेक्षा अधिक वेळा मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर ७ एप्रिल २०२२ रोजी फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु ही फेरनिवादाही रद्द करण्यात आली.

या स्थानकापाठोपाठ वांद्रे-कुर्ला संकुल ते शिळफाटय़ादरम्यान २१ किलोमीटरचा भुयारीमार्ग उभारण्यासाठीही २ मार्च २०२२ रोजी काढलेली निविदाही रद्द करण्यात आली होती. वांद्रे – कुर्ला संकुलातून भुयारी मार्ग जाणार आहे. परंतु येथील जागा एमएमआरडीए आणि अन्य यंत्रणांकडून प्राप्त झालेली नाही. त्यामुळे नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनला भुयारी मार्गाची निविदा रद्द करण्याशिवाय पर्याय नव्हता. आता स्थानक तसेच भुयारी मार्गाचा आराखडा आणि बांधकामासाठी फेरनिविदा मागवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनमधील अधिकाऱ्याने दिली.

स्थानकांची वैशिष्टय़े

  • सहा फलाट, प्रत्येकाची लांबी ४१५ मीटर. स्थानकाला मेट्रो आणि रस्त्याची जोडणी.
  • वांद्रे – कुर्ला संकुल हे मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरील एकमेव भूमिगत स्थानक. फलाट जमिनीपासून सुमारे २४ मीटर खोलीवर.
  • फलाट, कॉन्कोर्स आणि सव्‍‌र्हिस फ्लोअर असे तीन मजली.
  • ‘मेट्रो मार्गिका २ बी’च्या मेट्रो स्थानकांमध्ये प्रवेश करण्यासाठी दोन प्रवेश -निर्गमन बिंदू, दुसरे एमटीएनएल इमारतीच्या दिशेने.
  • नैसर्गिक प्रकाशासाठी स्कायलाइट.
  • सुविधांमध्ये सुरक्षा, तिकीट, प्रतीक्षालय, बिझनेस क्लास लाऊंज, नर्सरी, विश्रांती कक्ष, धूम्रपान कक्ष, माहिती केंद्र, सीसी टीव्ही केंद्र इत्यादींचा समावेश.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-07-2022 at 00:57 IST
Next Story
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळय़ानंतर घ्या!; राज्य सरकारची निवडणूक आयोगाकडे मागणी