मुंबई : वेतन आणि भविष्य निर्वाह निधीची रक्कम न मिळाल्याने गुरुवारीही पाच आगारांतील कंत्राटी चालकांनी ‘काम बंद’ आंदोलन पुकारले. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशीही प्रवाशांचे हाल झाले. बेस्टच्या ताफ्यात स्वमालकीच्या आणि भाडेतत्त्वावरील बस असून भाडेतत्त्वावरील बसगाडय़ा चालविण्यासाठी संबंधित कंपनीने कंत्राटी चालकांची नेमणूक केली आहे. कुर्ला, विक्रोळी, वांद्रे, वडाळा, कुलाबा या आगारांतील एमपी ग्रुपच्या कंत्राटी चालकांना गेल्या काही महिन्यांपासून वेळेवर वेतन मिळालेले नाही. शिवाय कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या खात्यावर भविष्य निर्वाह निधीची रक्कमही जमा करण्यात आलेली नाही. त्यामुळे कंत्राटी चालक मागणी पूर्ण करण्यासाठी वारंवार ‘काम बंद’ आंदोलन करत आहेत. याच मागणीवरून १७ मे रोजी ‘काम बंद’ आंदोलन करण्यात आल्यामुळे पाच आगारांमधून काही गाडय़ा सुटू शकल्या नाहीत. परिणामी, प्रवाशांचे हाल झाले. तर बुधवारीही आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले. गुरुवारीही त्याचीच पुनरावृत्ती झाली. त्यामुळे सलग तीन दिवस हाल होऊनही बेस्ट उपक्रम मात्र किरकोळ दंडात्मक कारवाई करीत आहे. यामुळे नाराजीचा सूर उमटू लागला आहे. पाच आगारांमधून १७ मे रोजी १६३ बस सुटू शकल्या नाहीत. १८ मे रोजी ३०८ आणि गुरुवारी २७५ बस सोडण्याचे नियोजन असतानाही या आगारातून १९२ बस सुटू शकल्या नाहीत. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून बेस्ट उपक्रमाने स्वमालकीच्या ८१ बस सोडल्या. परंतु त्याची संख्या कमी असल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. कुलाबा आगारातून ४, वडाळा आगारातून ६३, विक्रोळी आगारातून २८, वांद्रे आगारातून ४९ तर कुर्ला आगारातून ४८ बससेवा रद्द करण्यात आल्या.

कंत्राटी चालकांबाबत संबंधित कंपनी तोडगा काढण्यात अपयशी ठरत आहे. याबाबत मुंबई पालिका आयुक्तांशीही चर्चा करण्यात आली. तर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देऊन यावर तोडगा काढावा आणि कठोर निर्णय घेऊन प्रवाशांचे हाल थांबवण्याची मागणी केली जाईल. 

–  रवी राजा, माजी विरोधी पक्षनेते, मुंबई महापालिका आणि बेस्ट उपक्रम

कंत्राटदाराविरोधात कठोर कारवाई का करण्यात येत नाही, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. आंदोलनामुळे बसगाडय़ा रद्द होण्याचे प्रमाण जास्त असतानाच उपक्रम स्वमालकीच्या मोजक्याच बस चालवत आहेत. त्याही प्रवाशांना अपुऱ्या पडत आहेत. 

– सुनील गणाचार्य, माजी सदस्य, बेस्ट समिती