मुंबई : पक्षसंघटना बळकट करण्याबरोबरच शिवसेना आमदारांच्या मतदारसंघातील रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी मी लक्ष घालतोच आहे. पण तुम्हीही पुढाकार घ्या. पालकमंत्री व संपर्कमंत्री म्हणून जबाबदारी असलेल्या जिल्ह्यांतील शिवसेना आमदारांचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी घ्या. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी यंत्रणा तयार ठेवा, असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी शिवसेनेच्या मंत्र्यांच्या बैठकीत दिला.

मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेनंतर पक्षाच्या आमदारांची बैठक, जिल्हा प्रमुखांची बैठक घेतली होती.  त्याचाच पुढचा टप्पा म्हणून बुधवारी शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक घेतली. पक्षसंघटना बळकट करणे, आमदारांची कामे मार्गी लावणे, लोकोपयोगी कामांसाठी संस्थात्मक काम उभे करणे आणि राज्यसभा निवडणूक या विषयांवर  चर्चा झाली.

 मुख्यमंत्री शिवसेनेचा असताना पक्षाच्या आमदारांची कामे गतीने व्हायला हवीत. पण अनेक ठिकाणी आपल्या आमदारांची कामे रखडतात. ती कामे मार्गी लावण्यासाठी मी लक्ष घालतोच आहे. पण तुम्हीही त्यासाठी पुढाकार घ्या. पालकमंत्री व संपर्कमंत्री म्हणून जबाबदारी असलेल्या जिल्ह्यांतील शिवसेनेच्या आमदारांची कामे मार्गी लावण्याची जबाबदारी मंत्र्यांनी आपापसात घ्यावी असा आदेश मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंत्र्यांना दिला.

शिक्षण, आरोग्यसारख्या विविध लोकोपयोगी क्षेत्रात संस्थात्मक काम उभे राहील, याकडे लक्ष द्या. सहकारी संस्थांमध्ये लक्ष घाला.  त्यातून लोक पक्षाशी जोडले जातील. त्याचबरोबर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयारी सुरू करा. यंत्रणा सज्ज करा, असा आदेशही ठाकरे यांनी दिला.

‘राज्यसभेची दुसरी जागा जिंकायची’

शिवसेना राज्यसभेच्या दोन जागा लढवणार आहे. पहिल्या जागेसाठी मतांचा कोटा पक्षाकडे आहे. दुसरी जागा महाविकास आघाडी मिळून आपण लढवणार आहोत व ती जिंकायची आहे. त्यादृष्टीने राजकीय संपर्क-तयारी सुरू करा, असा आदेशही शिवसेनेच्या मंत्र्यांना देण्यात आला.