scorecardresearch

एसटी पूर्वपदावर येण्यासाठी आणखी काही दिवसांची प्रतीक्षा; महामंडळाला ३४ हजार चालक-वाहक परतण्याची आशा

राज्यातील एसटीची सेवा पूर्ववत होण्यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मुंबई : राज्यातील एसटीची सेवा पूर्ववत होण्यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. महामंडळाच्या ५३ हजार ९७३ चालक-वाहकांपैकी अद्याप ३४ हजार कर्तव्यावर रुजू झालेले नाहीत. त्यामुळे राज्यात एसटीच्या १६ हजार फेऱ्याच होऊ शकलेल्या आहेत. प्रवाशांची गैरसोय कायम असून ग्रामीण भागातील लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. उच्च न्यायालयाने २२ एप्रिलपर्यंत कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आदेश दिले असून त्यासाठी सात दिवस शिल्लक आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरण आणि अन्य मागण्यांसाठी २८ ऑक्टोबर २०२१ पासून संप पुकारला. उच्च न्यायालयाने आधी १५ एप्रिलपर्यंत कामावर परतण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले होते. त्यानंतर पुन्हा ७ एप्रिल २०२२ रोजी झालेल्या सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने संपकरी कर्मचाऱ्यांनी २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हावे असे आदेश देतानाच कर्मचाऱ्यांवर कारवाई करू नये, असे निर्देश महामंडळाला दिले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर विविध खात्यांतील सुमारे सहा हजार कर्मचारी कामावर परतले आहेत. मात्र त्यात चालक-वाहकांची संख्या कमीच आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ९ एप्रिलला विविध विभागांतील एकूण ७४३ कर्मचारी कामावर परतले होते. १२ एप्रिलला १,५६९ कर्मचारी आणि १४ एप्रिलला १,२४३ कर्मचारी कामावर रुजू झाले. यामध्ये चालक, वाहक परतण्याचे प्रमाण काहीसे कमीच आहे. एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, ४१ हजार ४६२ कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. तर ४० हजार २२१ कर्मचारी अजूनही संपावर आहेत. संपकऱ्यांमध्ये १९ हजार २९७ चालक आणि १५ हजार २८ वाहक आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाची सेवा अद्यापही पूर्ववत होऊ शकलेली नाही.

एसटीचा हजेरीपट

  • एकूण कर्मचारी ८१ हजार ६८३
  • चालक २९ हजार ३०३
  • वाहक २४ हजार ६७०

संपकऱ्यांना संभ्रमित करण्याचा प्रयत्न!

नागपूर : उच्च न्यायालयाने संपकरी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपूर्वी कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतरही अ‍ॅड्. सदावर्ते यांचे काही समर्थक समाजमाध्यमांद्वारे कर्मचाऱ्यांना २२ एप्रिल आधी कामावर रुजू होऊ नका, असे आवाहन करून संभ्रमित करीत आहेत. आपण एकाच दिवशी (२२ एप्रिल) कामावर हजर झालो तर आपल्याला सातवा वेतन आयोग आणि पाच महिन्यांचे वेतन मिळेल, असा संदेश कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांची दिशाभूल करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Worker st come wait hope drivers corporation ysh

ताज्या बातम्या