लोकसत्ता विशेष प्रतिनिधी मुंबई : जागतिक बँक प्रकल्पातील गोराई, चारकोप आणि मालवणीतील अत्यल्प व अल्प गटातील रहिवाशांना अखेर अतिरिक्त चटईक्षेत्रफळ मोफत उपलब्ध होणार आहे. याबाबतचा निर्णय वर्षभरापूर्वी तत्कालीन म्हाडा उपाध्यक्षांनी घेतला होता. मात्र त्याची आता अंमलबजावणी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे निवासयोग्य प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक बांधकामांना अतिरिक्त चटईक्षेत्रफळापोटी अधिमूल्य भरण्यापासून दिलासा मिळाला आहे. गोराई तीन, चारकोप- कांदिवली येथील सेक्टर क्रमांक आठ व नऊ आणि मालवणी-मालाड येथील जागतिक बँक प्रकल्पांतर्गत ज्या प्रकल्पधारकांना वा सहकारी गृहनिर्माण संस्थांना भाडेपट्टा करताना दीड इतके चटईक्षेत्रफळ लागू झाले आहे त्यांनाच हा लाभ मिळणार आहे. उर्वरित जागतिक बँक प्रकल्पधारकांना मात्र हा लाभ लागू होणार नाही, असे म्हाडा अधिकाऱ्याने स्पष्ट केले. आणखी वाचा-मुंबई : कंपनी व्यवस्थापकाची ८८ लाखांची सायबर फसवणूक या रहिवाशांना करारनामा करताना दीड इतके चटईक्षेत्रफळ लागू करण्यात आले होते. पॉईंट ८५ मोफत तर पॉईंट ६५ अधिमूल्य भरून उपलब्ध करून देण्यात आले होते. या रहिवाशांनी तळमजल्याचे बांधकाम करून पॉईंट ८५ चटईक्षेत्रफळ वापरले होते. त्यावर पॉइंट ६५ चटईक्षेत्रफळाइतका मजला चढविला होता. तो अधिमूल्य न आकारता नियमित करावा अशी मागणी करण्यात आली होती. ती मान्य करण्यात आली आहे. १९८५ ते १९९५ या काळात जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने मुंबई नागरी विकास प्रकल्प राबविण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने अत्यल्प आणि अल्प गटातील संकुल भूखंडाचे वितरण करण्यात आले. या संकुल भूखंडामध्ये २१, २५, ३० आणि ४० चौरस मीटर इतक्या आकाराच्या भूखंडांचा समावेश होता. १९८७ मधील शासन निर्णयानुसार अत्यल्प व अल्प गटातील या भूखंडांना पॉईंट ८५ इतके चटईक्षेत्रफळ लागू होते. मात्र गोराई तीन, चारकोप सेक्टर आठ व नऊ आणि मालवणी मालाड येथील अभिन्यास १.२ चटईक्षेत्रफळानुसार मंजूर झाले असून त्यामधील संकुल भूखंडांना दीड इतके चटईक्षेत्रफळ लागू करण्यात आले. आणखी वाचा-बोरिवली-विरार वाहतूक विस्ताराचा मार्ग मोकळा त्यानुसार दीड चटईक्षेत्रफळाचा वापर करून बांधकाम केलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना पॉईंट ६५ चटईक्षेत्रफळाकरीता अधिमूल्य आकारण्याबाबत देकार पत्र देण्यात आले होते. मात्र ते लागू होत नाही, असे संबंधित सहकारी गृहनिर्माण संस्थांचे म्हणणे होते. याबाबत म्हाडाचे तत्कालीन उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर यांच्याकडे सादरीकरण करण्यात आले होते. दीड इतक्या चटईक्षेत्रफळानुसार भाडेपट्टा केलेल्या गृहनिर्माण संस्थांना पॉईंट ६५ इतक्या चटईक्षेत्रफळाकरिता कोणतेही अधिमूल्य आकारू नये, असे आदेश दिले होते. मात्र या आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नव्हती. आता मुंबई गृहनिर्माण मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरिकर यांनी पत्रक काढून याबाबत आदेश जारी केला आहे.