मुंबई: राज्यातील मराठवाडा, विदर्भ भागातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी प्रकल्पांसोबतच दुष्काळग्रस्त भागात पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी वळविण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्य शासनाने तयार केला असून त्यासाठी जागतिक बॅंकेने भरीव अर्थसहाय्य करण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी येथे केली. जागतिक बॅंकेचे भारतातील प्रमुख ऑगस्टे तानो कौमे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज शिंदे यांची ‘वर्षां’ निवासस्थानी भेट घेतली. शिष्टमंडळात शबनम सिन्हा, आदर्श कुमार, सुदीप मोजुमदार, झियांग वाँग सदस्यांसमवेत निवृत्त सनदी अधिकारी प्रवीण परदेशी सहभागी झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या बैठकीत महाराष्ट्र कौशल्य विकास प्रकल्प, हवामान बदल आणि त्यामुळे कृषी क्षेत्रावर होणारा परिणाम, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जागतिक बॅंकेच्या अर्थसहाय्यातून राज्यात कौशल्य विकास कामे सुरू असून त्याद्वारे क्षमताबांधणीस मदत होत आहे. भविष्यातही अशाच प्रकारे राज्यातील विविध क्षेत्रातील प्रकल्पांना सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.

राज्यातील कृषी क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी सुरू असलेल्या विविध योजनांपैकी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोक्रा) मराठवाडा आणि विदर्भातील सुमारे पाच हजार गावांना फायदा होत आहे. या प्रकल्पाला जागतिक बॅंकेचे सहाय्य लाभले असून प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या यशस्वितेनंतर दुसऱ्या टप्प्यास मान्यता देण्याचे आवाहनही शिंदे यांनी केले. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील पुराचे पाणी दुष्काळग्रस्त भागात वळविण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्य शासनाने हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पिण्याच्या पाणी तसेच लाखो हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्यात येणार आहे. यामुळे शेतीला फायदा होणार असून त्यामुळे शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. याप्रकल्पासाठी जागतिक बॅंकेने सहकार्य करावे अशी मागणी शिंदे यांनी केली. 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World bank should finance flood water diversion project chief minister eknath shinde ysh
First published on: 25-11-2022 at 00:02 IST