मुंबई : दक्षिण मुंबईतील प्रासिद्ध छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ही वास्तु गेल्या १३८ वर्षांपासून दिमाखात उभी आहे. मुंबईतील या अतिशय देखण्या इमारतीला युनेस्कोकडून जागतिक वारसा वैभवाचा दर्जा देण्यात आला आहे. या ब्रिटिशकालीन ऐतिहासिक वास्तूची निर्मिती ही लंडनमधील एक प्रसिद्ध ऐतिहासिक रेल्वे स्थानकानुसार करण्यात आली आहे ही गोष्ट अनेकांना माहित नसते. आज ही दोन्ही रेल्वे स्थानके दिमाखात उभी आहेत.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे लाखो प्रवाशांच्या दैनंदिन रेल्वे प्रवासाचे केंद्र. हे स्थानक वास्तूकलेसाठी जगभर ओळखले जाते. या परिसरात असणाऱ्या अनेक ऐतिहासिक इमारतींपैकी या वास्तूच्या घुमटाची रचना वैशिष्ट्यपूर्ण असल्याने ती सर्वांचे लक्ष वेधून घेते. भारतीय आणि पाश्चात्य वास्तूकलेचा एक उत्तम नमुना म्हणून या स्थानकाकडे पाहिले जाते. ब्रिटिशकाळात हा फोर्ट परिसर हा मिनी लंडन म्हणून ओळखला जात असे.
लंडनमधील प्रसिद्ध रेल्वेस्थानक…
सीएसएमटी स्थानकाचे बांधकाम १८८७ पूर्ण झाले. याआधी एक छोटेखानी रेल्वेस्थानक या जागी होते ते पाडून त्याच जागी एका भव्य स्थानकाची निमिर्ती करण्यात आली. ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वेचे मुख्यालय म्हणूनही ते कार्यरत होते. सीएसएमटी वास्तूची रचना ही लंडनमधील प्रसिद्ध ‘सेंट पॅनक्रस’ या ऐतिहासिक स्थानकावरून करण्यात आलेली आहे.
दोन स्थानकांची कथा
संस्कृती, इतिहास आणि वास्तुकलेचा अप्रतिम संगम असलेली लंडनमधील ‘सेंट पॅनक्रस’ आणि मुंबईतील सीएसएमटी स्थानके ओळखली जातात. १८८७ मध्ये इंग्लंडच्या राणीच्या राज्यारोहणला सोहळ्याला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हे स्थानक उभारून त्याला ‘व्हीकटोरीया टर्मिनस’ नाव देण्यात आले होते. ब्रिटिश वास्तुशिल्पकार फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन्स यांनी या स्थानकाची रचना करताना ‘सेंट पॅनक्रस’ या स्थानकापासून प्रेरणा घेतली होती.
दोन्ही स्थानके सारखी का ?
दोन्ही स्थानकांमध्ये व्हिक्टोरियन गॉथिक रिव्हायव्हल शैलीची वैशिष्ट्ये दिसून येतात. नक्षीदार दगडी कोरीवकाम, टोकदार कमानी आणि रिब्ड व्हॉल्ट्स, भव्य घुमट आणि मनोरे, रंगीत काचांची सजावट आणि उंच छत, घड्याळ असलेले उंच मनोरे हे या दोन्ही वास्तूतील मुख्य आकर्षण आहे.
सीएसएमटी स्थानकाच्या वास्तूकलेत मुख्यतः समृद्ध भारतीय वास्तूशैलीचा स्पर्श आहे. या इमारतीवर असणारे नक्षीकाम, फुलांची रचना, प्राण्यांची शिल्प या साऱ्यातच आपल्याला भारतीय वास्तू कलेचे सौंदर्य दिसून येते. या मिश्र शैलीला ‘इंडो-सरासेनिक गॉथिक’ असे म्हटले जाते. हजारो किमी दूर असणारी ही दोन्ही स्थानके वास्तुशैलीमुळे एकमेकांशी जोडलेली आहेत.
