मुंबई : हिंदुत्त्ववादी संघटनांच्या पुढाकारातून होणाऱ्या जागतिक हिंदू परिषदेचे (वर्ल्ड हिंदू काँग्रेस) आयोजन यंदा मुंबईत केले जाणार आहे. १८, १९ आणि २० डिसेंबर रोजी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे ही परिषद होईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत या परिषदेचे उद्घाटन करतील.

या परिषदेत ६० हून अधिक देशांतील चार हजारांहून अधिक प्रतिनिधी सहभागी होतील. यात हिंदू नेते, विचारवंत, उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ, माध्यम प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा समावेश असेल. तीन दिवसांत ४५ हून अधिक सत्र आणि १५० हून अधिक वक्ते यात सहभागी होतील.

“समानं व्रतं सह चित्तम् – समान बांधिलकी, सामूहिक संकल्प” ही यंदाची संकल्पना आहे. भाषा, समाज, विश्वकर्मा आणि धर्म अशी चार विशेष सत्रे होतील. धर्म या सत्रात हिंदू, बौद्ध, शीख, ताओ, शिंतो आदी परंपरांचे आध्यात्मिक नेते एकत्र येणार आहेत. समाज या सत्रात सामाजिक समरसता आणि सामुदायिक विकासावर, तर भाषा या सत्रात भाषिक विविधता व सांस्कृतिक ओळख यावर चर्चा होईल. विश्वकर्मा सत्र कौशल्य, उद्योजकता आणि कारागीर, व्यावसायिकांच्या योगदानावर केंद्रित असेल.

जगभरात हिंदू धर्माशी जोडले गेलेले तरूण, राजकीय नेतृत्त्व, अर्थतज्ज्ञ, उद्योजक, महिला, शिक्षणतज्ज्ञ यांना या व्यासपीठावर एकत्र आणले जाईल. हिंदू मुल्य परंपरेवर विश्वास असलेल्यांचे या परिषदेत स्वागत असेल, असे वर्ल्ड हिंदू काँग्रेसचे स्वामी विज्ञानानंद यांनी सांगितले. भाषा हे समाज जोडण्याचे माध्यम असूनही नाहक भाषिक अस्मितेवरून संघर्ष पेटतो आहे. त्यामुळे यंदाच्या परिषदेत भाषेला स्थान देण्यात आले आहे. तसेच, व्यापार आणि उद्योगांना गती देणे हा त्याचा उद्देश आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हिमंता बिस्वा सरमा, मोहन यादव, एनएसईचे सीईओ आशिष कुमार चौहान, नीती आयोगाचे सदस्य प्रा. अभय करंदीकर, संजीव सन्याल, मनोज मुंतशिर, सुमंत सिन्हा, डॉ. विवेक राघवन, शाश्वत गोएंका यांच्यासह असे मान्यवर यात सहभागी होणार आहेत.

ही परिषद दर चार वर्षांनी होते. यापूर्वी नवी दिल्ली (२०१४), शिकागो (२०१८) आणि बँकॉक (२०२३) येथे झाली होती. अजय पिरामल हे मुंबई आयोजन समितीचे अध्यक्ष असून विशद मफतलाल आणि महेश भागचंदका उपाध्यक्ष आहेत.

भारत, थायलंड, कंबोडिया आदींचे संघटन

भारताची ओळख जगात दक्षिण आशियाई यापुरतीच मर्यादीत होऊन गेली आहे. त्यामुळे मर्यादा तोडत मक्का कराराच्या धर्तीवर कंबोडिया, लाओस, थायलंड आदी हिंदू, बौद्ध, शीख, ताओ, शिंतो आदी परंपरांशी नाते सांगणाऱ्या देशांचे संघटन करण्यावर या परिषदेचा भर असेल, असे स्वामी विज्ञानानंद यांनी सांगितले.