मुंबई : जागतिक तंबाखूमुक्त दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन (एसटी) महामंडळ आणि ‘हेड अँड नेक कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ (एचएनसीआयआय) यांच्या संयुक्त विद्यमाने एसटी बसचालक आणि कर्मचाऱ्यांसाठी कर्करोग तपासणी व जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई सेंट्रल येथील एसटी बस आगरामध्ये आयोजित या उपक्रमात चालक आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या मोहिमेत ‘एचएनसीआयआय’मधील तज्ज्ञ डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहभागींची कर्करोग तपासणी केली. तंबाखूजन्य कर्करोगाचे लवकर निदान आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. परिवहन क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना दीर्घकाळ वाहन चालविणे, ताणतणावपूर्ण वेळापत्रक आणि सतत प्रवास यांसारख्या परिस्थितींना सामोरे जावे लागते. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणी आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा अत्यंत महत्त्वाची असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

भारतामध्ये तंबाखूजन्य कर्करोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आढळते. तंबाखू सेवन हे त्यामागील प्रमुख कारण मानले जाते. याच पार्श्वभूमीवर या मोहिमेत तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम, कर्करोगाची प्रारंभिक लक्षणे आणि वेळेवर वैद्यकीय उपचारांचे महत्त्व याबाबत जनजागृती सत्रांचेही आयोजन करण्यात आले.

एचएनसीआयआयचे अध्यक्ष आणि वरिष्ठ सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. सुलतान प्रधान म्हणाले, कर्करोग उपचारांमध्ये लवकर निदान हे प्राण वाचवणारे ठरू शकते. एसटी महामंडळासोबतच्या या उपक्रमाद्वारे आम्ही चालक आणि कर्मचाऱ्यांमध्ये प्रारंभिक लक्षणांविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. तंबाखूमुळे होणारा कर्करोग टाळता येऊ शकतो आणि नियमित तपासणीमुळे त्याचे प्रमाण कमी होऊ शकतो.

एसटी मुंबई सेंट्रलचे आगार व्यवस्थापक वैभव कांबळे म्हणाले, एसटीचे चालक हे सार्वजनिक परिवहन व्यवस्थेचा कणा आहेत. त्यांचे आरोग्य आणि कल्याण आमच्यासाठी प्राधान्याचे आहे. जागतिक तंबाखूमुक्त दिनानिमित्त आयोजित हा उपक्रम प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा प्रोत्साहित करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल आहे. भविष्यातही अशा आरोग्य व जनजागृती मोहिमा राबविण्याचा आमचा मानस आहे.

चालक आणि कर्मचाऱ्यांपर्यंत थेट आरोग्य सेवा पोहोचवून नियमित तपासणीला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा उद्देश होता. एसटीच्या विस्तृत मार्गामध्ये भविष्यात अशाच प्रकारची तपासणी आणि जनजागृती मोहिमा राबविण्यासाठी हा उपक्रम आदर्श ठरू शकतो.

दरवर्षी ३१ मे रोजी जागतिक आरोग्य संघटनेच्या पुढाकाराने ‘जागतिक तंबाखूमुक्त दिन’ साजरा केला जातो. तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम अधोरेखित करणे आणि तंबाखूविरोधी प्रभावी आरोग्य धोरणांना प्रोत्साहन देणे हा या दिनाचा उद्देश आहे.