मुंबई : वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत येथील ५५६ रहिवाशांना काही महिन्यांपूर्वी पुनर्वसित इमारतीतील घरांचा ताबा देण्यात आला. आता दुसऱ्या टप्प्यात वरळी बीडीडीतील आणखी ८२७ घरे तयार झाली असून या घरांचेही वितरण करण्याचा निर्णय म्हाडाच्या मुंबई मंडळाने घेतला आहे. त्यानुसार इमारत क्रमांक १ मधील एफ, जी, एच विंगमधील ८२७ घरांच्या ताबा प्रक्रियेला गुरुवारपासून (२१ मे) सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे आता आणखी ८२७ बीडीडीवासीयांचे हक्काच्या घराचे आणि उत्तुंग इमारतीत ५०० चौरस फुटांच्या घरात वास्तव्यास जाण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

वरळी, ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव या तीन बीडीडी वसाहतींचा पुनर्विकास मुंबई मंडळाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या पुनर्विकासाअंतर्गत १५ हजारांहून अधिक बीडीडीवासीयांना उत्तुंग इमारतीत ५०० चौरस फुटांची घरे दिली जाणार आहेत. त्यानुसार तिन्ही ठिकाणी टप्प्याटप्प्याने पुनर्वसित इमारतींची कामे सुरू आहेत. जसजशी घरे तयार होतील, तसतसे त्यांचे वितरण करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी वरळीतील ५५६ बीडीडीवासीयांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते घराच्या चाव्या वितरित करण्यात आल्या होत्या.

काही दिवसांपूर्वीच नायगावमधील ८६४ रहिवाशांनाही घरांचा ताबा देण्यात आला. एका सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते घरांचे चावी वाटप करण्यात आले होते. आता ना. म. जोशी मार्ग चाळीतील रहिवाशांना हक्काच्या घराची प्रतीक्षा आहे. त्यांच्या एकाही टप्प्यातील घराचे वितरण अद्याप झालेले नाही. आता वरळीतील दुसऱ्या टप्प्यातील घराच्या वितरणास सुरुवात होणार असल्याची माहिती मुंबई मंडळाने दिली.

वरळीतील सुमेर केंद्र इमारतीच्या म्हाडा प्रकल्पस्थळ कार्यालयात गुरुवारपासून ताबा प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. दरम्यान, हा दुसरा टप्पा असल्याने कोणताही मोठा कार्यक्रम आयोजित करून चावी वाटप केले जाणार नाही. कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ११.०० ते सायंकाळी ६.०० दरम्यान सार्वजनिक सुट्टी वगळून घराच्या वितरणपत्रांचे वाटप केले जाणार आहे.

वितरणपत्र / ताबा स्वीकारताना लाभार्थ्यांनी पुनर्वसन सदनिका करारनामा, आधार कार्ड आणि पॅन कार्डची छायांकित प्रत, संक्रमण शिबीर सदनिकाधारकांचे हमीपत्र (५०० रुपयांच्या स्टँप पेपरवर नोंदणीकृत नोटरी केलेले), सदनिकाधारकांचे पासपोर्ट आकाराची ३ नवीन रंगीत छायाचित्रे, पुनर्वसित सदनिकेमध्ये सोबत वास्तव्य करणाऱ्या कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित छायाचित्रे (पोस्टकार्ड साईज) या आवश्यक कागदपत्रांसह रहिवाशांनी व्यक्तीशः उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.