मुंबई : गोरेगाव येथील कन्सर्टमध्ये अमली पदार्थ सेवनामुळे दोन तरुणाचा मृत्यू झाल्याच्या घटनेची पुनरावृत्ती पुन्हा घडली आहे. वरळी डोममधील अशाच कार्यक्रमात मद्याचे सेवन केल्यानंतर एका तरुणाचा मृत्यू झाला तर याच कार्यक्रमातील तरुणीला अत्यवस्थ स्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी ताडदेव पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यू नोंद करण्यात आली आहे. या कार्यक्रमात अमली पदार्थांचे सेवन केले होते का याची खात्री होऊ शकलेली नाही.

वरळी येथील डोम सभागृहात आयोजित कार्यक्रमात मद्याचे तसेच एनर्जी पेयाचे सेवन केल्यानंतर काही वेळात २८ वर्षे वयाचा तरुण जागीच कोसळला. त्याला तात्काळ ब्रीच कॅंडी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याला डॅाक्टरांनी मृत घोषित केले. याच कार्यक्रमातील एका तरुणीला (३१ वर्षे) अत्यवस्थ वाटू लागल्याने जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती आता स्थिर असल्याचे उपायुक्त जयंत मीना यांनी सांगितले. या तरुणीचा जबाब नोंदविण्यात आला असून त्यानुसार तिने मद्य आणि एनर्जी पेयाचे सेवन केले होते. त्यानंतर तिला काही वेळानंतर अस्वस्थ वाटायला लागले. अमली पदार्थांचे सेवन केलेले नाही, असे तिने सांगितले. संबंधित तरुण तसेच तरुणीची तपासणी करण्यासाठी रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत.

या कार्यक्रमात अमली पदार्थांचे सेवन करण्यात आले होते किंवा नाही, याची तपासणी सुरु असल्याचेही मीना यांनी सांगितले. संबंधित तरुणाच्या मृत्यूची चौकशी सुरु करण्यात आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले आहेत. याशिवाय या कार्यक्रमाला उपस्थितांची चौकशी सुरु करण्यात आली आहे. गोरेगाव येथील नेस्को मैदानात झालेल्या कन्सर्टमध्ये अमली पदार्थांचे सोवन केल्यामुळे दोन तरुणांचा मृत्यू झाला. त्यानंतर अशा कॅान्सर्टना परवानगी देण्यासाठी पोलिसांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. याशिवाय स्थानिक उपायुक्तांवर जबाबदारी सोपविण्यात आली होती. आता पुन्हा अशी घटना घडल्यामुळे कसून चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

गोरेगावात झालेल्या घटनेनंतर पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी नव्याने सूचना जारी केल्या होत्या. यामध्ये फक्त पूर्व व पश्चिम उपनगरातील अशा कार्यक्रमांचा उल्लेख होता. शहरात प्रामुख्यानो असे कार्यक्रम होत नसत. आता वरळी डोममधील घटनेमुळे खळबळ माजली आहे.