मुंबई : गेल्या वर्षी वरळी येथे मद्याच्या नशेत आलिशान गाडी चालवून एका दुचाकीला धडक दिली आणि एका महिलेच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी मिहीर शहा याच्याकडून पुरावे नष्ट करण्याच्या शक्यतेवर उच्च न्यायालयाने गुरूवारी बोट ठेवले. तसेच, खटल्यातील महत्त्वाच्या साक्षीदारांचे साक्षीपुरावे नोंदवल्यानंतर त्याला जामीन देण्याबाबत विचार केला जाऊ शकतो, असे मतही न्यायालयाने यावेळी व्यक्त केले.

मिहीर याने जामिनाच्या मागणीसाठी याचिका केली आहे, तर त्याला जामीन न देण्याच्या मागणीसाठी अपघातात मृत्यू पडलेल्या महिलेच्या पतीनेही हस्तक्षेप याचिका केली आहे. न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या एकलपीठापुढे मिहीर याच्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली. त्यावेळी, प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे वाचल्यानंतर याचिकाकर्त्याने अपघातानंतर स्वतःला वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले.

अपघाताच्या वेळी आपण नाही, तर चालकच गाडी चालवत होता हे दाखवण्याचा त्याने प्रयत्न केला. त्यावर, कोणत्याही हेतुने मिहीरकडून हा अपघात घडलेला नाही. शिवाय, अपघातानंतर तो घाबरला होता. त्यामुळे, अपघात झाला म्हणून नाही तर पोलिसांपासून वाचवण्यासाठी पळून गेला होता. कदाचित तो मद्याच्या धुंदीत असल्याने त्याने ही कृती केल्याचे त्याच्यावतीने बाजू मांडताना वरिष्ठ वकील अशोक मुंदरगी यांनी न्यायालयाला सांगितले. घाबरलेल्या व्यक्तीची ही एक बेफिकीर प्रतिक्रिया होती, असेही त्यांनी न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला.

तथापि, मिहीर अपघातानंतर जखमी महिलेला रुग्णालयात नेऊ शकला असता. परंतु, त्याऐवजी त्याने तेथून पळ काढला आणि आपण अपघात केलाच नाही हे दाखवण्याचा प्रयत्न केला. शिवाय, त्याच्यावर अद्याप आरोप निश्चित झालेले नाहीत. येत्या २५ नोव्हेंबर रोजी त्याच्यावर आरोप निश्चित केले जाणार आहेत. त्यामुळे, खटल्याच्या या टप्प्यावर त्याला जामीन मंजूर केल्यास तो पुरावे नष्ट करण्याचा व साक्षीदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करू शकतो. थोडक्यात, मिहीर याला कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नाही. परंतु, घटनेनंतरच्या त्याच्या वर्तनामुळे त्याला या टप्प्यावर जामीन देणे योग्य होणार नाही. याउलट खटला सुरू झाल्यानंतर महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदवू द्या. त्यानंतर त्याच्या जामीन याचिकेवर विचार करू, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. न्यायालयाने यावेळी सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.

प्रकरण काय ?

गेल्या वर्षी ७ जुलै रोजी, वरळी येथे शहा याने त्यांच्या बीएमडब्ल्यूने दुचाकीला धडक दिली, या धडकेत दुचाकीवर मागे बसलेल्या ४५ वर्षांच्या कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला आणि त्यांचे पती प्रदीप जखमी झाले. अपघातानंतर जखमी कावेरी यांना रुग्णालयात नेण्याऐवजी मिहीर याने त्यांना दीड किमीपर्यंत फरफरट नेले. त्यानंतर, मिहीर याने घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांच्या आरोपानुसार, घटनेच्या वेळी मिहीर मद्याच्या नशेत होता. अपघातानंतर त्याने चालकासह जागेची अदलाबदली केली व हा अपघात त्याने नाही, तर त्याच्या चालकाने केल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला. अपघातानंतर दोन दिवसांनी मिहीरला अटक करण्यात आली होती.