मुंबई : वरळीच्या समुद्रकिनाऱ्यावरील मुंबई पब्लिक स्कूलची इमारत धोकादायक झाल्याचे जाहीर करून मुंबई महानगरपालिकेने शाळेतील ६०० विद्यार्थ्यांना अन्य शाळेत स्थलांतरित करण्याचा घाट घातला होता. मात्र शिवसेनेच्या (ठाकरे) नगरसेविकेने महानगरपालिका अधिकाऱ्यांसोबत शाळेची पाहणी केली आणि शाळा इमारतीची डागडुजी करण्याच्या सूचना दिल्या. नगरसेविकेच्या सूचनेनंतर मुंबई महानगरपालिकेने घुमजाव करत इमारतीची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या शाळेतील सुमारे ६०० विद्यार्थ्यांचे स्थलांतर टळले.
मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मागील दोन वर्षांमध्ये चार शाळांच्या इमारती धोकादायक घोषित केल्या असून या शाळांमधील विद्यार्थ्यांना अन्य शाळांमध्ये स्थलांतर करत आहे. या सर्व इमारतींना किरकोळ डागडुजीची आवश्यक असतानाही मुंबई महानगरपालिका या शाळा इमारती धोकादायक जाहीर करून विद्यार्थ्यांचे स्थलांतर करत आहे. माटुंगा, कुलाबा येथील शाळांपाठोपाठ आता मुंबई महानगरपालिकेने वरळी समुद्रकिनाऱ्यावरील शाळेच्या इमारतीचे डिसेंबरमध्ये संरचनात्मक तपासणी केली. संरचनात्मक तपासणीच्या अहवालानुसार ही इमारत सी २ बी श्रेणीत असून या श्रेणीनुसार संबंधित इमारतीची दुरुस्ती करून ती पुन्हा वापरात आणता येऊ शकते.
मात्र, महानगरपालिकेने या शाळेची इमारत धोकादायक असल्याचे जाहीर करून इयत्ता सहावी ते दहावीच्या सुमारे ६०० विद्यार्थ्यांना जवळच्या शाळांमध्ये हलवण्याबाबतच्या सूचना पालकांना केल्या होत्या. त्यानंतर विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन पालकांनी एकत्र येऊन या निर्णयाला विरोध केला. पालिकेला विद्यार्थी सुरक्षेची एवढी काळजी आहे, तर संपूर्ण काळजी घेऊन विद्यार्थी असतानाच एकेका मजल्याच्या डागडुजीचे काम पालिका करू शकते. त्यासाठी संपूर्ण शाळा बंद ठेवण्याची गरज नसल्याचा मुद्दा पालकांनी उपस्थित केला. इमारतीच्या दुरुस्तीचे काम उन्हाळ्याच्या सुटीत करता येऊ शकते. तसेच इतर काळजी घेऊन ते पार पाडले जाऊ शकते, अशी भूमिका पालक व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रकाश नायडू यांनी मांडली होती.
शिवसेनेच्या (ठाकरे) स्थानिक नगरसेविका पद्मजा चेंबुरकर यांनी या प्रकरणात लक्ष घालून पालिका अधिकाऱ्यांसह शाळेची पाहणी केली. शाळा सुस्थितीत आहे. अगदी काही ठिकाणी दुरुस्तीची गरज आहे. दुरुस्तीचे काम विद्यार्थी असतानाही होऊ शकते. त्यामुळे ही शाळा संपूर्ण बंद न करता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेऊन दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशा सूचना चेंबूरकर यांनी अधिकाऱ्यांना केली.
विद्यार्थ्यांना कोठेही स्थलांतरित करण्यात येणार नाही. शाळेची दुरुस्ती करताना जर आवश्यकता भासल्यास पालकांच्या संमतीने विद्यार्थ्यांना दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत तात्पुरते जवळील शाळेमध्ये हलविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेऊनच दुरुस्तीचे काम करण्यात येईल. – किर्तीवर्धन किरतकुडवे, शिक्षणाधिकारी, मुंबई महानगरपालिका
