मुंबई : बीडीडी चाळ पुनर्विकासाअंतर्गत उभारलेल्या नायगावमधील पुनर्वसित इमारतीमधील रहिवाशांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जात असतानाच आता वरळीतील पुनर्वसित इमारतींमध्येही पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. वरळीतील पुनर्वसित इमारतींना अपुरा पाणीपुरवठा होत आहे. तर एसटीपीचे पाणी अद्याप उपलब्ध नसल्याने सध्या टँकरचे पाणी प्रसाधनगृहांसाठी वापरले जात आहे. पण सध्या टँकर चालकांनी संप पुकारला असून टँकरची संख्या कमी झाल्याने पाणीटंचाई आणखी गंभीर बनली आहे. रहिवासी पाणीटंचाईने हैराण झाले असून पाणीपुरवठ्याचा प्रश्न म्हाडाच्या मुंबई मंडळाने तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
आणखी ८२७ घरांची ताबा प्रक्रिया सुरू
वरळीतील ५५६ घरांचा ताबा ऑगस्ट २०२५ मध्ये देण्यात आला. तर गेल्या आठवड्यापासून येथील आणखी ८२७ घरांचा ताबा देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. पहिल्या टप्प्यात चावी वाटप करण्यात आलेल्या घरांमध्ये बहुतांश सर्व रहिवासी राहावयास आले आहेत. तर दुसऱ्या टप्प्यातील रहिवासी एक-एक करत वास्तव्यास येत आहेत. मात्र आता पुनर्वसित इमारतीतील रहिवाशांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. मागील काही दिवसांपासून अपुरा पाणीपुरवठा होत आहे. तर येथे राहण्यास येणाऱ्याच्या संख्येचा विचार न करता पाणीपुरवठ्याची सोय उपलब्ध करण्यात आली नसल्याने भविष्यात पाणीटंचाई आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त करीत रहिवाशांनी म्हाडाविरोधात संताप व्यक्त केला.
मुळात पाणीपुरवठ्याची योग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नसल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. तर दुसरीकडे भूमिगत टाक्यांमधून गळती होत असल्याने पाणीपुरवठ्यावर आणखी परिणाम होत आहे. त्याचवेळी ६० टक्के रहिवासी वास्तव्यास आल्यानंतर एसटीपीचे पाणी सुरू होते. त्यामुळे सध्या एसटीपीचे पाणी उपलब्ध नसून प्रसाधनगृहांसाठी टँकरचे पाणी पुरविले जात आहे. मात्र टँकर चालकांचा संप सुरू असून टँकरची संख्या कमी झाल्याने पाणीटंचाई गंभीर झाल्याची माहिती वरळी पुनर्वसित इमारतीतील रहिवाशाने दिली.
टँकरची संख्या वाढवू – म्हाडा
पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी रहिवाशांनी मुंबई मंडळाला पत्र पाठविले आहे. तर लोकप्रतिनिधींकडे तक्रारही करण्यात आली आहे. याविषयी मुंबई मंडळाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्यात आले आहे. त्याशिवाय प्रकल्पास मान्यता मिळतच नाही. सध्या मुंबईत १० टक्के पाणी कपात असल्याने काहीशी पाणीटंचाईची समस्या जाणवत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. एसटीपीचे पाणी लवकरात लवकर सुरू करण्यासाठी मुंबई महापालिकेकडे पाठपुरावा सुरू आहे. सध्या एसटीपीसाठी टँकरने पाणीपुरवठा केला जातो. पण टँकर चालकांच्या संपामुळे पुरेसे टँकर उपलब्ध होत नाहीत. मात्र आम्ही शक्य तितके अधिक टँकर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
