मुंबई : गेले काही दिवस वरळी, प्रभादेवी परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसत असून कचरा वेळच्या वेळी उचलला जात नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. मात्र, पुढील तीन ते चार दिवस ही स्थिती अशीच राहणार असल्याची शक्यता आहे. महापालिकेने मुंबईतील कचरा संकलनाच्या पद्धतीत बदल केला असून मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागाने सेवाधारित कंत्राट दिले आहे. वरळी, प्रभादेवीत हे कंत्राट सुरू झाले असून नवी यंत्रणा पूर्णत: कार्यान्वित होण्यासाठी ३ ते ४ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
महापालिकेने मुंबईत दृश्यमान स्वच्छतेसाठी कचरा संकलनाच्या पद्धतीत बदल केला आहे. या बदलास कामगार संघटनांनी प्रचंड विरोध केला होता. मात्र, हा विरोध मोडून काढत हे कंत्राट टप्प्याटप्प्याने मुंबईच्या सर्व विभागांत सुरू होणार आहे. आतापर्यंत भांडुपचा समावेश असलेल्या एस विभागात हे कंत्राट सुरू झाले आहे. नुकतेच वरळी, प्रभादेवीचा समावेश असलेल्या ‘जी दक्षिण’ प्रशासकीय विभागातही कचरा संकलन व वाहतुकीसाठी ही नवी यंत्रणा कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
यापूर्वी कार्यरत व नव्या यंत्रणेतील सेवा स्थित्यंतरामुळे वरळी, प्रभादेवी आदी भागांतील घनकचरा सेवेवर परिणाम होत आहे. नवी यंत्रणा पूर्णत: कार्यान्वित होण्यासाठी ३ ते ४ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. सेवा स्थित्यंतरामुळे काही भागात कचरा संकलनात होत असलेली गैरसोय टाळण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.
कचरा संकलन यंत्रणा अशी
मुंबईत रोज सुमारे ७,२०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो व हा कचरा संकलित करून कचराभूमीपर्यंत वाहून नेला जातो. हा कचरा संकलित करून त्याची वाहतूक करण्यासाठी यापूर्वी अस्तित्वातील निरनिराळ्या यंत्रणांऐवजी आता सर्वसमावेशक असा नव्या प्रकारचा एकात्मिक प्रकल्प सुरू करण्यात येत आहे.
या अंतर्गत कचराविषयक सर्व कामांची जबाबदारी एकाच यंत्रणेकडे असेल. त्यात कचरा संकलन, वाहतूक करणे, कचऱ्याच्या १.१ घनमीटर क्षमतेच्या डब्यांची निगा राखणे, त्यांची देखभाल करणे,
– रस्त्याकडील असलेल्या कचरापेट्या बसवणे, त्यांची निगा राखणे, तसेच त्यातील कचरा वेळोवेळी वाहून नेणे, नागरिकांनी वर्गीकरण केलेला सुका कचरा वाहून नेणे आदी बाबींचा प्रामुख्याने समावेश आहे.
– कचऱ्यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी स्वतंत्र कक्ष (कॉल सेंटर) असेल. या ठिकाणी निःशुल्क क्रमांकावर तक्रार करता येईल.
– या संपूर्ण सेवेसाठी प्रचलित वाहनांपेक्षा अधिक वहनक्षमतेची वाहने वापरली जातील. त्यामुळे, वाहनांची संख्या कमी होईल, तसेच वायू प्रदूषणातही घट होईल. या वाहनांमध्ये कचरा बंदिस्त करून वाहून नेला जाईल.
– ओल्या कचऱ्यातील सांडपाणी साठविण्याची यंत्रणा वाहनात असेल. त्यामुळे, रस्त्यांवर दुर्गंधी पसरणार नाही. तथापि, एकूण वाहनांपैकी १०-१५ टक्के वाहने विजेवर धावणारी असतील.
पालिकेचे आवाहन
मुंबई महापालिकेने संपूर्ण मुंबईतील कचरा उचलण्यासाठी एकूण आठ कंत्राटदारांची नेमणूक केली आहे. टप्प्याटप्प्याने या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येईल. पालिकेच्या ‘जी दक्षिण’ विभागात ३ ऑगस्ट २०२६ पासून या प्रकल्पाला सुरुवात झाली आहे. कचरा संकलनातील बदलाचा हा कालावधी ३ ते ४ दिवसांचा असून त्यानंतर स्थिती पूर्वपदावर येईल. त्यामुळे, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
