मुंबई : संसदेत महिला आरक्षणाबाबत विरोधकांनी घेतलेल्या भूमिकेला विरोध दर्शविण्यासाठी भाजपने वरळीत काढलेल्या मोर्च्यात मी २५ मिनिटे अडकले होते. मुलीला संगीत वर्गातून आणण्यासाठी मी निघाले होते. मात्र, वाहन पुढे सरकत नसल्याने गाडीतून खाली उतरल्यानंतर मोर्च्याबाबत माहिती मिळाली. मार्गात अडथळा बनलेल्या दोन बस हटविण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांना दीड तास विनवणी केली.
मात्र, कोणाकडूनही प्रतिसाद मिळाला नाही. त्या मोर्चात सहभागी मंत्री गिरीष महाजन यांनीच माझे म्हणणे ऐकून घेण्याचा प्रयत्न, असे स्पष्टीकरण देत मोर्चा स्थळी वाहतूक कोंडीबाबत जाब विचारणाऱ्या टीना चौधरी यांनी घुमजाव केले. मोर्चात महाजन यांना कठोर शब्दात जाब विचारणाऱ्या चौधरी यांनी अचानक मवाळ भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
विरोधकांनी समर्थन न दिल्यामुळे लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले नाही. त्यांनतर भाजपने देशभरात विरोधकांविरोधात निदर्शने, मोर्चे काढले. मुंबईत वरळी येथे २१ एप्रिल रोजी मोर्चा काढण्यात आला होता. मात्र, त्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीचा सामान्य नागरिकांना मोठा फटका बसला. अनेकजण तासन््तास कोंडीत अडकले होते.
बराच वेळ वाट पाहूनही वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्याची चिन्हे दिसत नसल्याने टीना चौधरी संतप्त झाल्या आणि त्यांनी मोर्चास्थळी तैनात पोलिस अधिकारी, राजकीय व्यक्तींना खडेबोल सुनावले. गिरीष महाजन यांनाही त्यांनी जाब विचारला. त्याबाबतची ध्वनीचित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली. त्यांनतर अनेकांनी टीना चौधरी यांचे कौतुक केले. मात्र, अनेकांनी टीकाही केली. मोर्चानंतर १२ दिवसांनी संबंधित टीना चौधरी यांनी धनीचित्रफितीच्या माध्यमातून याविषयी स्पष्टीकरण दिले.
त्या घटनेनंतर माझ्याविषयी काळजी वाटणाऱ्या अनेकांचे मला संदेश आले. मी ठीक आहे. त्या दिवशी मी मुलीला संध्याकाळी ४ वाजता संगीत वर्गात सोडले. त्यांनतर तिला परत आणण्यासाठी मी संध्याकाळी ४.४५ च्या सुमारास घरातून निघाले. महिंद्रा ताजपासून डावीकडे वळल्यावर मी वाहतूक कोंडीत अडकले. मी सुमारे २५ मिनिटे गाडीत होते. मी कोणत्याही पोलिसावर किंवा मोर्चेकऱ्यांवर बाटली फेकली नाही. ती कृती केवळ लक्ष वेधण्यासाठी केली होती, असे स्पष्टीकरण चौधरी यांनी दिले.
माझे आजोबा आणि वडील भारतीय सैन्य दलात होते. त्यांनी देशासाठी दोन युद्ध लढली. माझ्या कुटुंबातील आठ जणांनी भारतीय सैन्यात सेवा केली आहे. ज्यावेळी तुम्ही गणवेश परिधान करता, त्यावेळी तुम्ही जनतेचे सेवक असता. तुम्हाला कोणाचाही अपमान करण्याचा अधिकार नसतो, असेही त्या म्हणाल्या. संध्याकाळी ६.५० पर्यंत मी वाहतूक कोंडीतच अडकून होते. त्यावेळी डोक्यात केवळ मुलीचा विचार सुरू होते. त्यावेळी केवळ गिरीष महाजन यांनी मी काय म्हणत आहे, हे एकूण घेण्याचा प्रयत्न केला, असे त्या म्हणाल्या.
त्यांनी यंत्रणांना सूचना केल्यांनतर अडथळा ठरणाऱ्या बस वाटेतून बाजूला करण्यात आल्या आणि तेथील वाहतूक कोंडी सुटली, असा दावा टीना चौधरी यांनी केला. माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय पोळी भाजू नये माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणत्याही राजकीय पक्षाने पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये, असे त्यांनी खडसावले. सर्वच राजकीय पक्ष एकाच माळेचे मणी आहेत. त्यांच्यामुळे सामान्य माणसाला मनस्ताप सहन करावा लागतो. नागरी प्रश्नांबाबत मी जनतेचा आवाज बनून पुढे यावे, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली. तुम्हाला स्वतःचा आवाज नाही का, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
