मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) वरळी-शिवडी उन्नत रस्ता प्रकल्पात सोमवारी रात्री उशिरा झालेल्या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी मंगळवारी दोघांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतरही या अपघाताची माहिती कंत्राटदार जे कुमारकडून एमएमआरडीएला देण्यात आली नव्हती. प्रसारमाध्यमांकडून याबाबत विचारणा झाल्यानंतर एमएमआरडीएला याबाबतची माहिती मिळाली.
अपघातानंतर तब्बल २० तासांनी कंत्राटदाराने अपघाताची माहिती एमएमआरडीएला दिली. याप्रकरणाची बुधवारी एमएमआरडीएने जे कुमारला एक कोटी रुपयांचा दंड आकारला आहे. जे कुमारच्या हलगर्जीपणामुळे सातत्याने एमएमआरडीएच्या प्रकल्पात अपघात होत असून केवळ एका मेट्रो ९ (दहिसर ते मिरा-भाईंदर) प्रकल्पाच्या कामात सात जणांचा मृत्यू झाला आहे. तेव्हा इतक्या लोकांचे बळी घेणाऱ्या कंत्राटदारावर केवळ दंडात्मक कारवाई न होता गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे.
फेब्रुवारीतही अपघात
दक्षिण मुंबईला अटल सेतूशी जोडणाऱ्या वरळी-शिवडी उन्नत रस्त्याचे काम कंत्राटदार म्हणून जे कुमारच्या माध्यमातून सुरू आहे. जे कुमारकडून प्रत्येक प्रकल्पात हलगर्जीपणा होत असून प्रकल्पात अपघातांची मालिका सुरूच आहे. वरळी-शिवडी उन्नत रस्त्याच्या कामादरम्यान फेब्रुवारीमध्ये एका तरुणाच्या डोक्यात एक जड सळई आदळली होती. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर कंत्राटदाराविरोधात केवळ दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही घटना होऊन दोन महिने उलटत नाही तोच ५ मे रोजी रात्री सव्वा बाराच्या सुमारास ए. डी. मार्गावर पुन्हा प्राणघातक अपघात घडला. खांबांसाठी वापरण्यात येणारे स्टील शटर हायड्रा मशीनच्या सहाय्याने हलवित असताना एक मजूर त्या शटरखाली सापडून गंभीर जखमी झाला. रवी गिरी (१९ वर्षे) असे या मजुराचे नाव असून त्याला केईएम रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर याप्रकरणी नातेवाईकांच्या तक्रारीनुसार भोईवाडा पोलिसांनी क्रेन चालक आणि सुपरवायझरविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सल्लागारानेही माहिती दडवली
सोमवारी रात्री अपघात झाला, एकाचा बळी गेला, याप्रकरणी गुन्हा दाखल झाला, मात्र तरीही सायंकाळी रात्री ८-९ वाजेपर्यंत याची माहिती एमएमआरडीएला नव्हती. कंत्राटदाराने याबाबत तातडीने एमएमआरडीएला कळविणे अपेक्षित असताना २० तासांनंतरही त्यांनी याबाबत माहिती दिली. प्रसारमाध्यमांपर्यंत यासंबंधीचे वृत्त आल्यानंतर प्रसारमाध्यमांनी यासंबंधी विचारणा केली असता असा अपघात घडल्याचे एमएमआरडीएला समजले. त्यानंतर एमएमआरडीएने विचारणा केली असता कंत्राटदाराकडून याबाबत माहिती देण्यात आली. अखेर आता या प्रकरणाची दखल एमएमआरडीएने घेतली असून त्याला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. दरम्यान, प्रकल्पावर सुरक्षेची काळजी घेण्याची जबाबदारी ज्या सल्लागारावर असते त्या सल्लागाराने अर्थात अॅसिस्टम स्टुप या फ्रेंच कंपनीने या अपघाताची माहिती एमएमआरडीएपासून लपवली. तसेच सुरक्षेबाबतही काळजी घेतली नाही. त्यामुळे या कंपनीलाही एमएमआरडीएने २५ लाखांचा दंड ठोठावला आहे. जे कुमारकडून सातत्याने हलगर्जीपणा होत असून एमएमआरडीएच्या प्रकल्पातच अंदाजे आठ जणांचा बळी गेला आहे. अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. नुकतीच बीकेसीमध्येही कामादरम्यान क्रेन कोसळली होती. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. सातत्याने या कंपनीकडून हलगर्जीपणा केला जात असून त्यात नागरिकांचा बळी जात असताना कंपनीविरोधात केवळ दंडात्मक कारवाई करून कंपनीला अभय दिले जात आहे. यावेळीही एमएमआरडीएने दंडात्मक कारवाई केली आहे. माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी त्यावर आक्षेप घेऊन कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याची गरज व्यक्त केली आहे.
आतापर्यंत अंदाजे १० कोटींचा दंड
मेट्रो ३ (आरे ते कफ परेड) मार्गिकेच्या कामादरम्यान स्थानकात पाणी शिरल्याप्रकरणी एमएमआरसीने (MMRC) २ कोटी रुपयांचा दंड केला होता. मेट्रो २ ब (डीएन नगर-मंडाले): कामाच्या संथ गतीमुळे आणि पुलाच्या कामातील त्रुटींमुळे १.२ कोटी आणि ४६ लाखांचा दंड लावला होता. मिरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेदरम्यान सर्वाधिक अपघात या कंपनीकडून झाले असून त्यात सात जणांना जीव गमवावा लागला. यातही कंपनीविरोधात दंडात्मक कारवाईच झाली आहे. मेट्रो-९ मार्गिकेतील कामादरम्यान २०२५ मध्ये उंचावरून ३० किलोचा हायड्रॉलिक जॅक पडल्याप्रकरणी १० लाखांचा दंड आकारला होता. अशा प्रकारे या कंत्राटदाराला या दोन-तीन वर्षांत अंदाजे १० कोटीपर्यंतचा दंड आकारण्यात आला आहे.
