मुंबई: वरळी-शिवडी उन्नत रस्ता प्रकल्पातील प्रभादेवी दुमजली पुलाच्या कामातील अडथळा अखेर दूर झाला आहे. पुलाच्या बांधकामात बाधित होणारी हाजी नुरानी इमारत अखेर रिकामी करून घेण्यात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) यश आले आहे. इमारत रिकामी झाल्याने आता ही इमारत पाडण्याच्या कामास मंगळवारपासून सुरूवात करण्यात येणार आहे. पुढील दोन-तीन दिवसात पाडकाम सुरु राहणार आहे. हे पाडकाम पूर्ण झाल्यास प्रभादेवी दुमजली पुलाच्या कामाला वेग दिला जाणार आहे.
दोन इमारती बाधित
दक्षिण मुंबईतून अटल सेतूला जाण्यासाठी वरळी-शिवडी उन्नत रस्ता बांधण्यात येत आहे. या प्रकल्पाचे काम आतापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र भूसंपादन आणि इतर कारणामुळे प्रकल्प पूर्णत्वास विलंब झाला आहे., या प्रकल्पाअंतर्गत ब्रिटीशकालीन प्रभादेवी पूल पाडून त्या जागी नवीन दुमजली पूल बांधण्याच्या कामास विलंब झाला आहे. पुलाच्या कामासाठी प्रभादेवी येथील दोन इमारती विस्थापित कराव्या लागणार असून त्यातील रहिवाशांनी मात्र योग्य पुनर्वसनाचा मुद्दा उचलून विस्थापनाला विरोध केला. त्यामुळे पुलाचे पाडकाम आणि पर्यायाने नवीन पुलाचे काम रखडले होते. पण आता मात्र या इमारतींचा प्रश्न निकाली काढण्यात एमएमआरडीएला यश आले आहे. काही दिवसांपूर्वी लक्ष्मी निवास इमारत रिकामी करून तिचे पाडकाम सुरु केल्यानंतर आता हाजी नुरानी इमारतही रिकामी करण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएतील अधिकाऱ्यांनी दिली. इमारत रिकामी झाल्याने आता मंगळवारपासून इमारतीच्या पाडकामास सुरुवात केली जाणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
इमारतीच्या बाजूने पात्र्याचे कुंपण घालून मंगळवारी तातडीने पाडकामास सुरुवात केली जाणार आहे. पाडकाम सुरु झाल्यापासून पुढील दोन ते तीन दिवस हे काम सुरु राहणार आहे. तर लक्ष्मी निवास आणि हाजी नुरानी या दोन्ही इमारतींची जागा रिकामी करून त्यावर दुमजली इमारतीच्या खांबांच्या कामाला सुरूवात केली जाणार आहे. प्रभादेवी दुमजली पुलाच्या कामातील मोठा अडथळा आता दूर झाल्याने पुलाच्या कामाला वेग येईल असा विश्वास अधिकार्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान सप्टेंबर २०२६ पर्यंत वरळी-शिवडी उन्नत रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे नियोजन एमएमआरडीएचे आहे. त्यासाठी दुमजली पुलाच्या कामाला वेग देणे आवश्यक होते. त्यानुसार लक्ष्मी निवास आणि हाजी नुरानी इमारतींचा प्रश्न एमएमआरडीएने अखेर निकाली काढला आहे.
