मुंबई : वरळी – शिवडी उन्नत रस्ता प्रकल्पाअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या प्रभादेवी दुमजली पुलाच्या कामातील शेवटचा आणि मोठा अडसर अखेर दूर झाला. या कामासाठी प्रभादेवी पुलालगतच्या दोन इमारती रिकाम्या कराव्या लागणार होत्या. मात्र योग्य पुनर्वसनाच्या मुद्यावरून निर्माण झालेल्या वादामुळे पुलाच्या कामास विलंब होण्याची भीती निर्माण झाली होती. अखेर या दोन्ही इमारती रिकाम्या करून घेण्यात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास (एमएमआरडीए) यश आले आहे.
काही दिवसांपूर्वी लक्ष्मी निवास इमारत रिकामी करून तिचे पाडकाम पूर्ण केल्यानंतर आता हाजी नूराणी इमारत रिकामी करण्यात आली आहे. आता पुढील १५ दिवसांत या इमारतीचे पाडकाम पूर्ण करण्यात येणार आहे. हे काम पूर्ण झाल्यास प्रभादेवी दुमजली पुलाच्या कामाला वेग येणार आहे.
सप्टेंबरमध्ये उन्नत रस्ता पूर्ण करण्याचे नियोजन
अटल सेतूला जोडणाऱ्या वरळी-शिवडी उन्नत रस्ता प्रकल्पाच्या पूर्णत्वास बराच विलंब झाला आहे. पण आता मात्र सप्टेंबर २०२६ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करून सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. या प्रकल्पातील प्रभादेवी दुमजली पुलाच्या कामासाठी येथील लक्ष्मी निवास आणि हाजी नूराणी चाळ पाडावी लागणार होती. मात्र येथील रहिवाशांनी योग्य पुनर्वसनाचा मुद्दा उचलून धरल्याने इमारती रिकाम्या करण्यास अडसर निर्माण झाला होता. अखेर या रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी एमएमआरडीएने ९० कोटी रुपये खर्च करून म्हाडाकडून ८० हून अधिक घरे घेतली. ही घरे रहिवाशांना वितरित करण्यात आली. मात्र तरीही रहिवासी घरे रिकामी करत नव्हते.
एमएमआरडीएने सातत्याने पाठपुरावा करून काही दिवसांपूर्वी लक्ष्मी निवास इमारत रिकामी करून घेतली. अंदाजे १०० वर्षे जुनी या इमारतीचे पाडकाम करणे आव्हानात्मक होते. प्रदूषणविषयक, तसेच इतर नियमांचे पालन करून इमारत पाडण्यासाठी २५ दिवसांचा कालावधी एमएमआरडीएला लागला. ही इमारत मातीची असल्याने धूळ उडू नये यासाठी पाणी मारून इमारतीचे पाडकाम करावे लागल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तर आता अशाच प्रकारचे हाजी नूराणी इमारतीचे पाडकाम केले जाणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
लक्ष्मी निवास रिकामी झाली तर हाजी नुराणी रिकामी होत नव्हती. मागील १५ दिवसांपासून यासाठी अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू होते. मात्र इमारत रिकामी होत नव्हती. रहिवाशांचे काही मुद्दे होते. अखेर त्यावर मार्ग काढून मंगळवार आणि बुधवार अशा दोन दिवसांत हाजी नूराणी इमारत रिकामी करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आता हाजी नूराणी इमारतीचे पाडकाम १५ दिवसांत पाडकाम पूर्ण केले जाईल. या इमारतीचे पाडकाम पूर्ण झाल्यास प्रभादेवी दुमजली पुलाच्या पर्यायाने वरळी-शिवडी उन्नत रस्त्याचे काम वेगाने पुढे जाईल, असा विश्वासही अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
