मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) वरळी-शिवडी उन्नत रस्ता प्रकल्पातील भूसंपादनाचा अडथळा अखेर दूर झाला आहे. प्रकल्पातील प्रभादेवी दुमजली पुलाच्या बांधकामात बाधित होणाऱ्या प्रभादेवीतील दोन इमारतींच्या विस्थापनाचा तिढा अखेर सुटला आहे.
लक्ष्मी निवास इमारतीतील सर्व रहिवाशांना कायमस्वरूपी घरे वितरित करून इमारत रिकामी करण्यात आली आहे. तर या इमारतीच्या पाडकामास शुक्रवारपासून सुरुवात करण्यात आली. लवकरच हाजी नुरानी इमारतही रिकामी करून घेत तिचेही पाडकाम केले जाणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर वरळी-शिवडी उन्नत रस्ता प्रकल्पाअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या प्रभादेवी दुमजली पुलाच्या कामाला वेग येणार आहे.
दक्षिण मुंबईतून अटल सेतूला अतिजलद जाण्यासाठी वरळी-शिवडी उन्नत रस्ता बांधला जात आहे. या उन्नत रस्ता आतापर्यंत पूर्ण होऊन वाहतूक सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने प्रकल्पास विलंब झाला आहे. आता मात्र हा रस्ता सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन एमएमआरडीएचे आहे. त्यानुसार एमएमआरडीएनेही आपल्या भागातील कामाला वेग दिला आहे. महारेलच्या हद्दीतील कामालाही वेग देण्याचा आदेश महारेलला एमएमआरडीएने दिला आहे.
आता उन्नत रस्ता प्रकल्पामधील प्रभादेवी दुमजली पुलाच्या कामातील भूसंपादनाचा अडसरही दूर झाला आहे. या पुलाच्या कामासाठी प्रभादेवी येथील लक्ष्मी निवास आणि हाजी नुरानी इमारतीचे विस्थापन करावे लागत आहे. मात्र या इमारतीतील रहिवाशांनी विस्थापनास विरोध केला होता. तिथल्या तिथे पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी जनआंदोलन केले होते. जुन्या प्रभादेवी पुलाच्या पाडकामादरम्यान रस्त्यावर उतरून आंदोलनही केले होते. रहिवाशांच्या विरोधामुळे पुनर्वसनाचा मुद्दा गंभीर बनला होता आणि त्याचा कामावर परिणाम होत होता. पण अखेर आता एमएमआरडीएला हा प्रश्न निकाली काढण्यात यश आले आहे.
लक्ष्मी निवास आणि हाजी नुरानी इमारतीतील ७८ रहिवाशांसाठी एमएमआरडीएने म्हाडाची ७८ घरे घेतली आहेत. यासाठी एमएमआरडीएने म्हाडाला ९० कोटी रुपये दिले आहेत. ही घरे एमएमआरडीएकडे वर्ग झाल्यानंतर घरांचे वितरण सुरू करण्यात आले असून लक्ष्मी निवासमधील सर्व रहिवाशांना घरे वितरित करण्यात आली आहेत. तर ही इमारत पूर्णतः रिकामी झाल्याने शुक्रवारपासून या इमारतीच्या पाडकामास सुरुवात करण्यात आल्याची माहिती महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली.
हाजी नुरानी इमारतीतील काही रहिवाशांची घरे रिकामी करून घेणे बाकी आहे. ही इमारतही लवकरच रिकामी करून घेण्यात येणार असून त्यानंतर तिचे पाडकाम सुरू केले जाणार आहे. या दोन्ही इमारतींचा प्रश्न सुटल्याने आता प्रभादेवी दुमजली पुलाच्या पर्यायाने उन्नत रस्त्याच्या कामाला वेग येईल, असेही मुखर्जी यांनी सांगितले.
दरम्यान, महारेलच्या हद्दीतील काम संथगतीने सुरू असून त्यांना वेग वाढविण्याचे आदेश एमएमआरडीएने दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत सप्टेंबर २०२६ मध्ये हा प्रकल्प पूर्ण करून उन्नत रस्ता सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. आता भूसंपादनाचा अडथळा दूर झाला असून आता कामाला वेग येतो का आणि सप्टेंबरपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होतो का, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
