मुंबई: वरळीतील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांबाबत (एसआरए) शिवसेना (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते रोहित पवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांची भेट घेतली. यावेळी वरळी सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या विस्तारासाठी आरक्षित भूखंडावर बांधकाम विकासकाला एसआरए अंतर्गत संक्रमण शिबिरांच्या इमारतीचे बांधकाम करण्याची परवानगी दिल्याप्रकरणी दोन भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी रोहित पवार यांच्याकडून करण्यात आली.

वरळीतील रखडलेल्या एसआरए प्रकल्पांच्या प्रश्नांबाबत आदित्य ठाकरे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी पोहोचले असता, काही वेळातच राहित पवारही वरळीच्याच प्रश्नावर महिंद्रकर यांची भेट घेण्यासाठी दाखल झाले. यावेळी एसआरएच्या प्रलंबित कामांबाबत दोन्ही नेत्यांनी चर्चा केली तसेच आण्णाभाऊ साठे स्मारकासंदर्भातही काही मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. यावेळी रोहित पवार यांनी न्यायालयाने ठपका ठेवलेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी निवेदन दिले.

महापालिकेच्या वरळी सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या विस्तारासाठी आरक्षित भूखंडावर संक्रमण शिबिराच्या इमारतींचे बांधकाम करण्याची परवानगी वरळी अर्बन डेव्हलपमेंट प्रोजेक्ट लिमिटेड या कंपनीला देण्यात आली. वास्तविक हा भूखंड मुंबई महापालिकेला हस्तांतरीत करायचा होता. मात्र, भूखंडाचे सीमांकन न करता यावर संक्रमण शिबिराच्या इमारत बांधकामाला परवानगी देण्यात आली, याकडे पवार यांनी आपल्या पत्रात लक्ष वेधले आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने ९ फेब्रुवारी २०२६ च्या आदेशात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले आहेत.न्यायालयाने एसआरएचे उपमुख्य अभियंता राम मिटकरी आणि कार्यकारी अभियंता डी. बी. पाटील यांच्याविरोधात विभागीय चौकशी करण्याचे निर्देश दिल्याचे पवार यांनी पत्रात म्हटले आहे.

या दोन अधिकाऱ्यांनी तब्बल पाच हजार कोटी रुपयांचा भ्रष्टचार केला असून न्यायालयाने त्यांच्यावर कसे ताशेरे ओढले याबाबतची माहिती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देऊन त्यांच्यावर न्यायालयाच्या आदेशानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.