सिंधुदुर्गात जागा देण्याची राज्याची तयारी
कोकणात जैतापूर किंवा अन्य रासायनिक प्रकल्पांना शिवसेनेचा विरोध असतानाच, केंद्र सरकारच्या वतीने एक लाख कोटींची गुंतवणूक करून तीन रिफायनरी उभारण्याचा प्रस्ताव असून यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात जागा देण्याची तयारी राज्य शासनाच्या वतीने सोमवारी दर्शविण्यात आली.
कोकणात समुद्रात हा प्रकल्प उभारण्याची योजना असून, या संदर्भात केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. यावेळी शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई हे उपस्थित होते. भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तेल कंपन्यांच्या वतीने देशातील मोठय़ा हरित रिफायनरींची उभारणी कोकण किनाऱ्यावर करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी जागा मिळावी, अशी मागणी केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आली. त्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात विजयदुर्गजवळ जागा देण्याची तयारी राज्य शासनाच्या वतीने दर्शविण्यात आली. सुमारे १५ हजार हेक्टर जागा देण्याची राज्याची योजना आहे. यातील पाच हजार हेक्टर जागा ही समुद्रकिनारी असेल. सुमारे एक लाख कोटींच्या या प्रकल्पातून सुमारे एक लाख लोकांना रोजगार उपलब्ध होईल. या प्रकल्पामुळे कोकणाचा कायापालट होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
शिवसेना कोणती भूमिका घेणार ?
* जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध आहे. याशिवाय कोकणात रासायनिक विभाग सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करताच शिवसेनेने विरोध केला होता.
* कोकणात रिफायनरी प्रकल्प सुरू करण्याच्या संदर्भात झालेल्या बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई हेसुद्धा उपस्थित होते.
* हरित रिफायनरी असली तरी कोकणाच्या पर्यावरणावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे सेना आता कोणती भूमिका घेते हे महत्त्वाचे ठरणार आहे.



