वडाळा रेल्वेस्थानकावरील स्टेशन मास्तरांनी शनिवारी (८ जून) गोरेगावला जाणाऱ्या लोकलला चुकीचा सिग्नल दाखवल्यामुळे हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. ही लोकल गोरेगावला जाणार होती. मात्र, स्टेशन मास्तरांनी या लोकलला वाशीला जाण्याचा सिग्नल दाखवला. मात्र मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे ही लोकल वडाळा स्थानक सोडून पुढे गेली नाही. मोटरमनने त्वरित नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून लोकल गोरेगावच्या मार्गावर वळवली. मात्र या सर्व गोष्टींमध्ये बराच वेळ गेला. परिणामी हार्बर रेल्वे मार्गावरील सेवा बराच वेळ विस्कळीत झाली होती.

सकाळी १० वाजून ५४ मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून ही लोकल सुटली आणि २० मिनिटांनी वडाळा रेल्वेस्थानकावर दाखल झाली. वडाळा स्थानकानंतर हार्बर रेल्वे दोन वेगवेगळ्या मार्गांवर धावते. ही लोकल एका लाईनवरून गोरेगावच्या दिशेने जाते, तर दुसऱ्या लाईनवरील लोकल वाशी-पनवेलच्या दिशेने जाते. ही लोकल गोरेगावला जाणार होती. परंतु, स्टेशन मास्तरांनी या लोकलला चुकीची दिशा दाखवली. त्यामुळे ही लोकल वाशी मार्गावरून पुढे सरकू लागली. मात्र, ही गोष्ट मोटरमनच्या लगेच लक्षात आली. त्यानंतर मोटरमन आणि गार्डने नियंत्रण कक्षाला याबाबतची माहिती दिली, तसेच त्यांनी लोकल थांबवली. परिणामी सीएसएमटी ते वडाळादरम्यानच्यी हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती.

हे ही वाचा >> “भाजपाने आमच्याबरोबर दुजाभाव केला”, शिंदे गटाची खदखद; मंत्रिपदांवरून एनडीएत वाद पेटला?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नियंत्रण कक्षाने स्टेशन मास्तरांशी संपर्क साधल्यानंतर ही लोकल परत गोरेगावला जाणाऱ्या रेल्वे मार्गावर वळवण्यात आली. मात्र यामध्ये अर्धा तास गेला. यामुळे हार्बर रेल्वेची सेवा धिम्या गतीने चालू होती. दरम्यान, स्टेशन मास्तरांच्या या चुकीमुळे त्यांना वरिष्ठांनी मेमो दिला आहे. स्टेशन मास्तरांनी त्यांच्या वेळापत्रकात चूक केल्यामुळेच त्यांनी गोरेगावला जाणाऱ्या लोकलला चुकीचा सिग्नल (वाशीला जाणारी दिशा दाखवली) दाखवल्याचं निष्पन्न झालं आहे. या प्रकरणाची चौकशी करून स्टेशन मास्तरांवर कारवाई केली जाऊ शकते.