मुंबई : यंदाचे ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक’ ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ या संस्थेला जाहीर करण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी कृषी, औद्योगिक, समाजरचना, व्यवस्थापन, प्रशासन, सामाजिक एकात्मता, विज्ञान, तंत्रज्ञान, ग्रामीण विकास, आर्थिक सामाजिक विकास, मराठी साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील व्यक्ती अथवा संस्थेस यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक देण्यात येते. लस उत्पादनातील योगदानाबद्दल ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ या संस्थेला हे पारितोषिक दिले जाणार आहे.

दोन लाख रुपये रोख व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीदिनी म्हणजे २५ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजता यशवंतराव चव्हाण केंद्रात त्याचे वितरण होईल.