शुक्रवारी दिवसभर योगगुरू रामदेव बाबा यांनी महिलांविषयी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू होती. ठाण्याच्या हायलँड मैदानावर रामदेव बाबा यांनी योगाचे धडे दिले. यावेळी अमृता फडणवीसही तिथे उपस्थित होत्या. यावेळी रामदेव बाबांनी केलेल्या विधानावरून राज्यात संतप्त प्रतिक्रिया येत असताना त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर परखड शब्दांत टीका केली आहे. तसेच, त्यांनी अमृता फडणवीस यांनाही खोचक शब्दांत सवाल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले होते रामदेव बाबा?

योगगुरू रामदेव बाबा यांनी ठाण्यात योगाचे धडे देताना व्यासपीठावरूनच महिलांच्या कपड्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. “अमृता फडणवीस पुरेसे अन्न खातात. पुढील शंभर वर्षं त्या म्हाताऱ्या होणार नाहीत. कारण, त्या नेहमी आनंदी राहतात. जसा आनंद अमृता फडणवीस यांच्या चेहऱ्यावर आहे, तसाच तुमच्या चेहऱ्यावर पाहायचा आहे”, असं रामदेव बाबा म्हणाले. पुढे बोलताना, “महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात आणि काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात”, असं आक्षेपार्ह विधान रामदेव बाबा यांनी केलं.

“आमच्या अमृता वहिनी गप्प कशा बसल्या?”

दरम्यान, रामदेव बाबा यांच्या विधानावर संजय राऊतांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना परखड शब्दांत टीका केली.” रामदेव बाबांनी असं लज्जास्पद विधान केलं असताना तिथे उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी उपस्थित असल्याचं मला समजलं. असं विधान केल्यानंतर आमच्या अमृता वहिनी गप्प कशा बसल्या? असं विधान करणारा कुणीही कितीही मोठा असो, त्याच्या सणसणीत कानाखाली बसायला पाहिजे”, अशा शब्गांत त्यांनी अमृता फडणवीसांना सवाल केला आहे.

“अमृता फडणवीस १०० वर्षे म्हाताऱ्या होणार नाहीत, कारण…”, बाबा रामदेव यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव

“…एवढंच मला पाहायचंय”

“एका बाजूला तुम्ही महिलांच्या रक्षणाच्या, सबलीकरणाच्या गोष्टींसाठी कायदे बनवता, ज्ञान पाजळता. त्याचवेळी असंख्य महिलांसमोर एक बाबा भगव्या वस्त्रात महिलांचा असा अपमान करतो. राज्यपालांच्या बाबतीत सरकार गप्प बसलंय, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषेवर सरकार तोंड शिवून बसलंय. आता रामदेव बाबांसारखे भाजपाचे महाप्रचारक महिलांविषयी असे अभद्र उच्चार काढतात, तरी सरकार गप्प बसलंय. या सरकारची जीभ दिल्लीला गहाण ठेवलीये का? एवढंच मला पाहायचंय”, अशा शब्दांत संजय राऊतांनी शिंदे सरकारला लक्ष्य केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yogguru ramdev baba controversial statement sanjay raut slams amruta fadnavis eknath shinde pmw
First published on: 26-11-2022 at 10:37 IST