मुंबई : थरथरणारे हात, मंदावलेली हालचाल आणि हरवत जाणारे संतुलन असा हा पार्किन्सनचा आजार आता भारतासाठी एक मोठ सार्वजनिक आरोग्य संकट बनू लागला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा आजार केवळ वृद्धांपुरता मर्यादित राहिलेला नाही तर तरुणांमध्येही त्याचे प्रमाण वेगाने वाढताना दिसत आहे. ‘वर्ल्ड पार्किन्सन्स डे’ निमित्त समोर आलेल्या आकडेवारीन आरोग्य व्यवस्थेची चिंता वाढवली आहे.

भारतामध्ये सध्या ५ ते ७ लाखांहून अधिक लोक पार्किन्सनने ग्रस्त असल्याचा अंदाज आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते वास्तविक संख्या याहून खूप मोठी असू शकते, कारण मोठ्या प्रमाणावर रुग्णांचे निदानच होत नाही. जगातील एकूण पार्किन्सन रुग्णांपैकी जवळपास १० टक्के रुग्ण भारतात आहेत, ही बाबही गंभीर आहे.

सर्वात चिंताजनक ट्रेंड म्हणजे ‘अर्ली ऑनसेट’ पार्किन्सनिस. देशातील सुमारे ४० टक्के रुग्ण हे २२ ते ४९ वयोगटातील आहेत. याचाच अर्थ करिअरच्या उमेदीच्या काळातच हा आजार अनेकांना ग्रासत आहे. बदलती जीवनशैली, प्रदूषण, कीटकनाशकांचा वाढता वापर आणि वाढलेला मानसिक ताण हे या वाढत्या प्रकरणांमागील प्रमुख कारणं असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

भविष्यातील चित्र आणखी धोकादायक आहे. २०५० पर्यंत भारतातील पार्किन्सन रुग्णसंख्या तब्बल १६८ टक्क्यांनी वाढून सुमारे २८ लाखांपर्यंत पोहोचू शकते. वाढती वृद्ध लोकसंख्या आणि आयुर्मान वाढ हे यामागील मुख्य घटक मानले जात आहेत. या पार्श्वभूमीवर भारत जगातील सर्वाधिक पार्किन्सन रुग्ण असलेला देश ठरू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे.

वाढत्या रुग्णसंख्येसमोर आरोग्य यंत्रणा अपुरी पडताना दिसते. देशात न्यूरोलॉजिस्टची संख्या मर्यादित आहे तर ग्रामीण भागात तर ही सेवा जवळपास नाहीच. अनेक ठिकाणी रुग्णांना सुरुवातीची लक्षणं ओळखली जात नाहीत आणि ‘वयामुळे होतंय’ म्हणून दुर्लक्ष केलं जात. परिणामी, निदान उशिरा होतं आणि उपचार अधिक गुंतागुंतीचे बनतात.

आर्थिक बाजूही तितकीच गंभीर आहे. पार्किन्सन हा पूर्णपणे बरा न होणारा, आयुष्यभर चालणारा आजार असल्याने औषधोपचार, फिजिओथेरपी आणि केअरगिव्हिंगचा खर्च मोठा असतो. त्यामुळे मध्यमवर्गीय आणि ग्रामीण कुटुंबांवर मोठा आर्थिक आणि मानसिक ताण येतो.दरम्यान वैद्यकीय क्षेत्रात काही सकारात्मक घडामोडीही घडत आहेत.

डीप ब्रेन स्टिम्युलेशन (डिबीएस) सारख्या आधुनिक उपचारपद्धती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तंत्रज्ञानामुळे रुग्णांच्या जीवनमानात सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र हे उपचार अजून तरी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. पार्किन्सनकडे दुर्लक्ष केल्यास येत्या दशकात भारताला मोठ्या आरोग्य संकटाला सामोर जाव लागू शकतं. हात थरथरणे, चालण्यात बदल, आवाज मंदावणे अशी लक्षणं दिसताच त्वरित वैद्यकीय सल्ला घेणं आवश्यक आहे.

‘पार्किन्सनिस हा वयाचा नव्हे, तर जागरूकतेचा आजार आहे.’ वेळेत ओळख आणि योग्य उपचार हेच या वाढत्या संकटावर उत्तर ठरू शकतात हाच ‘वर्ल्ड पार्किन्सन डे’ निमित्त संदेश म्हणावा लागेल.