मुंबई : राज्यातील शहरी भागांसह ठाण्यातही तरुणांमध्ये मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचे चिंताजनक चित्र समोर येत आहे. पूर्वी प्रामुख्याने मध्यमवयीन आणि ज्येष्ठ नागरिकांपुरते मर्यादित असलेले हे आजार आता २० ते ३० वयोगटातील युवकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळू लागले आहेत. आरोग्य तज्ज्ञांच्या मते बदलती जीवनशैली आणि वाढता ताणतणाव यामुळे ही समस्या गंभीर होत चालली आहे.

कॉर्पोरेट आणि आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांमध्ये दीर्घकाळ बसून काम करण्याची सवय, अनियमित आहार आणि अपुरी झोप यामुळे शरीरावर विपरीत परिणाम होत आहे. फास्ट फूड, जंक फूड आणि साखरयुक्त पेयांचे वाढते सेवन, तसेच व्यायामाचा अभाव यामुळे लठ्ठपणाचे प्रमाणही वाढत असून त्यातून मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा धोका अधिक तीव्र होत आहे. तरुण वयातच हे आजार निदान होणे ही गंभीर बाब आहे. अनेकदा सुरुवातीला कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत, त्यामुळे नियमित तपासणीकडे दुर्लक्ष होते. मात्र वेळेत निदान आणि उपचार न झाल्यास हृदयविकार, स्ट्रोक आणि मूत्रपिंडाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो असे लीलावती रुग्णालयातील ज्येष्ठ मधुमेह व एंन्डोक्रोनॉलॉजीस्ट डॉ शशांक जोशी यांनी सांगितले.

ताणतणाव हा देखील एक महत्त्वाचा घटक ठरत आहे. करिअरमधील स्पर्धा, कामाचा वाढता ताण आणि बदललेली जीवनशैली यामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होत असून त्याचा थेट परिणाम शारीरिक आरोग्यावर दिसून येतो. या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी जीवनशैलीत सकारात्मक बदल करणे अत्यावश्यक आहे. नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप आणि ताणतणाव कमी करण्यासाठी योग व ध्यान यांचा अवलंब केल्यास या आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकतो असेही डॉ जोशी यांनी सांगितले.एकूणच तरुणांमध्ये वाढणारे मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे आरोग्य क्षेत्रासाठी धोक्याची घंटा ठरत असून यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे.मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे केवळ वैयक्तिक आजार नसून सार्वजनिक आरोग्याचा मोठा धोका असून अर्थव्यवस्थेवरही त्याचा मोठा ताण येऊ शकतो असेही डॉ जोशी म्हणाले.

जीवनशैलीतील झपाट्याने झालेले बदल, वाढते शहरीकरण, ताणतणाव आणि अयोग्य आहारपद्धती यामुळे भारतात मधुमेह (डायबेटीस) आणि उच्च रक्तदाब (हायपरटेन्शन) या आजारांचे प्रमाण अभूतपूर्व वेगाने तरुणांमध्ये वाढत असल्याचे ताज्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अहवालांतून स्पष्ट झाले आहे. आरोग्य क्षेत्रासाठी ही गंभीर इशारा देणारी परिस्थिती मानली जात आहे.आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघाच्या (आयडीएफ) अहवालानुसार भारतात सुमारे ७.४ कोटी प्रौढ मधुमेहग्रस्त असून २०४५ पर्यंत ही संख्या १२.५ कोटींहून अधिक होण्याचा अंदाज आहे. भारत जगात मधुमेहग्रस्तांच्या संख्येत दुसऱ्या क्रमांकावर आहे. याचवेळी आयसीएमआर-ाआयएनडीआयएबीच्या अलीकडील बहुराज्यीय अभ्यासानुसार देशात मधुमेहाचे एकूण प्रमाण ११.४ टक्के असून, प्रीडायबेटीसचे प्रमाण १५.३ टक्के इतके आढळले आहे. याचाच अर्थ मोठा तरुणवर्ग मधुमेहाच्या उंबरठ्यावर उभा आहे.

उच्च रक्तदाबाबाबतही चित्र तितकेच चिंताजनक आहे. नॅशनल फॅमीली हेल्थ सर्व्हे-५ नुसार भारतातील १५ वर्षांवरील सुमारे २४ टक्के महिला आणि २८ टक्के पुरुष उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहेत. मात्र, यातील मोठ्या प्रमाणावर रुग्णांना आपल्याला हा आजार असल्याची जाणीवच नसते. जागतिक आरोग्य संघटनेच्या २०२३ च्या ‘ग्लोबल हायपरटेन्शन रिपोर्ट’ नुसार जगभरात उच्च रक्तदाब असलेल्या प्रौढांपैकी जवळपास अर्ध्याहून अधिक लोकांचे निदान झालेले नाही, आणि भारतातही हीच स्थिती दिसून येते.या दोन्ही आजारांचे धोकादायक वैशिष्ट्य म्हणजे ते सुरुवातीला कोणतीही स्पष्ट लक्षणे दाखवत नाहीत. त्यामुळे निदान उशिरा होते आणि हृदयविकार, स्ट्रोक, मूत्रपिंड निकामी होणे, डोळ्यांचे विकार यांसारख्या गंभीर गुंतागुंती उद्भवतात. आयसीएमआरच्या अहवालानुसार, भारतातील एकूण मृत्यूंपैकी ६० टक्क्यांहून अधिक मृत्यू नॉन-कम्युनिकेबल डिसीजेस (एसीडी) मुळे होतात ज्यात मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे प्रमुख घटक आहेत.

महाराष्ट्रासारख्या शहरी राज्यात परिस्थिती अधिक गंभीर आहे. एनएफएचएस-५ नुसार महाराष्ट्रात उच्च रक्तदाबाचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या जवळपास असून शहरी भागात ते अधिक आहे. मुंबई, पुणे यांसारख्या महानगरांत बसून काम करण्याची पद्धत, फास्ट फूडचे वाढते सेवन आणि व्यायामाचा अभाव हे प्रमुख कारणे म्हणून समोर येत आहेत. तसेच आयसीएमआरच्या अभ्यासानुसार शहरी भागात मधुमेहाचे प्रमाण ग्रामीण भागाच्या तुलनेत लक्षणीयरीत्या जास्त आहे.