मुंबई: शहरातील धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीचा परिणाम आता तरुणांच्या आरोग्यावर स्पष्टपणे दिसू लागला आहे. विशेषतः २० ते ४० वयोगटातील तरुणांमध्ये किडनी स्टोन (मूत्रपिंडातील खडे) होण्याचे प्रमाण वाढत असल्याची बाब तज्ज्ञांनी अधोरेखित केली आहे. एसी ऑफिसमध्ये तासनतास बसून काम करणे, दिवसाभरात पुरेसे पाणी न पिणे आणि खारट, प्रोसेस्ड अन्नाचे वाढते सेवन ही या समस्येची मुख्य कारणे ठरत आहेत.

तज्ज्ञांच्या मते, एसी वातावरणात काम करताना शरीराला घाम कमी येतो, त्यामुळे तहानही जाणवत नाही. परिणामी अनेकजण नकळत पाणी कमी पितात आणि शरीरात डिहायड्रेशन निर्माण होते. याचा थेट परिणाम किडनीवर होतो. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यावर मूत्र अधिक दाट होते. अशा स्थितीत कॅल्शियम, ऑक्सलेट आणि युरिक अॅसिड यांसारखे घटक एकत्र येऊन सूक्ष्म क्रिस्टल्स तयार करतात.

कालांतराने हेच क्रिस्टल्स मोठे होत किडनी स्टोनमध्ये रूपांतरित होतात. यामध्ये खारट आणि प्रोसेस्ड अन्नाचे जास्त सेवन ही समस्या अधिक तीव्र करते. कारण जास्त मीठामुळे शरीरातून कॅल्शियमचे प्रमाण वाढून ते मूत्रात साचते आणि खडे तयार होण्याचा धोका वाढतो.आजच्या कॉर्पोरेट जीवनशैलीत कामाचा ताण, सततच्या मिटिंग्स आणि डेडलाईन्स यामुळे पाणी पिण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचेही तज्ज्ञ सांगतात.

त्यातच पॅकेज्ड स्नॅक्स, फास्ट फूड आणि जंक फूडवर वाढलेले अवलंबित्व ही परिस्थिती अधिकच गंभीर बनवत आहे. विशेषतः आयटी आणि कार्यालयीन नोकऱ्यांमध्ये कार्यरत तरुणांमध्ये हा ट्रेंड जास्त प्रमाणात दिसून येत आहे. किडनी स्टोनची सुरुवात बहुतांश वेळा शांतपणे होते. मात्र, स्टोनचा आकार वाढल्यावर अचानक तीव्र वेदना जाणवू लागतात.

कंबरेत किंवा पाठीच्या बाजूला असह्य वेदना, लघवी करताना जळजळ, लघवीत रक्त येणे, मळमळ किंवा उलट्या ही त्याची प्रमुख लक्षणे आहेत. अनेकदा ही स्थिती इतकी गंभीर होते की रुग्णाला तातडीने उपचार घ्यावे लागतात.तज्ज्ञांच्या मते, ही समस्या टाळणे कठीण नाही. दररोज किमान २.५ ते ३ लिटर पाणी पिणे, आहारातील मीठाचे प्रमाण कमी ठेवणे, ताजे आणि संतुलित अन्न घेणे, तसेच लिंबूवर्गीय फळांचा आहारात समावेश करणे यामुळे किडनी स्टोनचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो.

यासोबतच नियमित व्यायाम आणि सक्रिय जीवनशैलीही महत्त्वाची ठरते.एकूणच किडनी स्टोन ही केवळ वैद्यकीय समस्या नसून ती आधुनिक जीवनशैलीचा परिणाम असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे वेळेत योग्य सवयी अंगीकारणे आणि आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष देणे हीच काळाची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.