मुंबई : समाजमाध्यमांवरील पैसे दुप्पट करण्याची जाहिरात भांडुपमधील एका तरुणाला महागात पडली आहे. आरोपीने तरुणाला अधिक पैसे देण्याचे आमिष  दाखवून त्याच्याकडून एक लाख रुपये उकळल्याचे उघडकीस आले असून याप्रकरणी त्याने भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. एका खासगी कंपनीत कामाला असलेल्या ३२ वर्षीय तरुणाने काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांवर पैसे दुप्पट करण्याची एक जाहिरात वाचली. पाच हजार रुपये भरल्यास  काही वेळातच दुप्पट पैसे  मिळणार असल्याचे आमिष तरुणाला दाखवण्यात आले. त्यामुळे त्याने तत्काळ संबंधित बँक खात्यात पैसे जमा केले. त्यानंतर आरोपीने तरुणाकडून १५ हजार अनामत रक्कम घेतली. आणखी २० हजार रुपये भरल्यास तुम्हाला ८० हजार रुपये मिळतील, असे त्याला सांगण्यात आले. या तरुणाने आरोपीच्या सांगण्यावरून संबंधित बँक खात्यात अनेक वेळा पैसे जमा केले. तरुणाने अशा प्रकारे एकूण ९४ हजार रुपये आरोपीच्या खात्यात जमा केले. यातील केवळ २५ हजार रुपये तरुणाला परत मिळाले.  त्यानंतर आरोपीने तरुणासोबत संपर्क साधणे बंद केले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे या तरुणाच्या लक्षात येताच, त्याने याबाबत भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.