समाज माध्यमांतून तरूणाईचे आवाहन
बुद्धीदाता असणाऱ्या श्री गणेशाने सध्याच्या तरुणाईला सुबुद्धी दिल्याचे संकेत मिळत आहेत. सार्वजनिक आणि काही प्रमाणात घरगुती गणेशोत्सवाच्या बदलत्या स्वरुपावर टीका होत असताना यंदा मात्र या उत्सवाच्या माध्यमातून यथाशक्ती समाजऋण फेडण्याचा निर्धार तरुणांनी केल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रात विशेषत: मराठवाडय़ात पडलेल्या दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर अनेक तरुणांनी सामाजिक भान जपत घरगुती गणपतीपुढे जमा होणारी रक्कम दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचे आवाहन केले आहे. यासाठी या तरुणांनी आपली हक्काची व्यासपीठे म्हणजे समाजमाध्यमांतील ‘फेसबुक’, ‘व्हॉट्सअ‍ॅप’चा आधार घेतला आहे. गणेशोत्सव काळात गणेश मूर्तीसमोर जमा होणारी रक्कम, दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी दान करा, असे आवाहन हे तरुण करीत असून त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे.
नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे हे कलाकार मराठवाडय़ातील दुष्काळग्रस्त, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे कुटुंबीयांना मदतीचा हात देण्यास पुढे सरसावले असून त्या त्या भागात फिरून ते आर्थिक मदत करत आहेत तसेच त्यांना आधार देत आहेत. वलयांकित असणाऱ्या नाना आणि मकरंद यांचे हे पाऊल महाविद्यालयीन विद्यार्थी आणि युवकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. आजकाल घरगुती गणपती म्हटला तरी गणपतीच्या दर्शनाला नातेवाईक आणि परिचितांबरोबरच मित्र परिवार मोठय़ा संख्येने दर्शनाला येत असतो. दर्शनाला येताना त्यांच्याकडून फूल ना फुलाची पाकळी म्हणून गणपतीपुढे काही रक्कम अर्पण केली जाते. जमा झालेली ही रक्कम एकत्र करून आणि त्यात आपली तसेच आपल्या कुटुंबीयांच्या थोडय़ा रकमेची भर टाकून ती मदत म्हणून नाना पाटेकर किंवा मकरंद अनासपुरे यांच्यापर्यंत किंवा मुख्यमंत्री मदतनिधीस पोहोचविण्यात यावी, असा विचार सुरू झाला आहे.
काहींनी घरच्या गणपतीसमोर दानपेटी ठेवण्याची आणि दर्शनासाठी आलेल्या मंडळींना त्यांच्या इच्छाशक्ती आणि ऐपतीनुसार आर्थिक मदत करण्याचे आवाहन ‘व्हॉट्स अ‍ॅप’वर संदेशाद्वारे केले आहे. घरगुती गणपतीचे विसर्जन झाले की घरातील सर्व मंडळींचे एकत्र हॉटेलात जेवायला जाणे किंवा हॉटेलातून ऑर्डर देऊन खाणे मागविणे हा पायंडाही पडला आहे. यंदा हॉटेलात न जाता तो खर्च वाचवता येऊ शकतो. त्या रकमेत आपली स्वत:ची भर घालून जी काही थोडीफार रक्कम जमा होईल त्याचाही विनियोग दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी करावा, असा विचारही पुढे आला आहे.
‘व्हॉट्स अ‍ॅप’चा वापर केवळ विनोद आणि फालतू संदेश पाठविण्यासाठी न करता अशा प्रकारे विचार करून मदतीचे आवाहन करणारे संदेश आपल्या जास्तीत जास्त समूहावर पाठविण्यात येत असून इतरही त्यापासून प्रेरणा घेताना दिसत आहेत.