मुंबई : प्रसिद्ध ताज हॉटेलसमोर परवानगीशिवाय ड्रोन उडवणाऱ्या युवकाला पोलिसांनी पकडले. मुंबईतील उच्च सुरक्षा यंत्रणांच्या देखरेखीखालील कुलाबा परिसरात मोठा सुरक्षा भंग झाला आहे. सोमवारी पहाटे, २२ वर्षीय युवकाला परवानगीशिवाय ताज हॉटेलजवळ ड्रोन उडवताना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

अरमल्ला जेसी आयझॅक अब्राहम लिंकन असे आरोपी तरूणाचे नाव असून तो तेलंगणातील हैदराबादमधील रहिवासी आहे. ताज हॉटेलच्या सभोवतालचा परिसर संवेदनशील क्षेत्र म्हणून ओळखला जातो आणि येथे कायमस्वरूपी सुरक्षा यंत्रणा कार्यरत असतात. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शीघ्र कृती पथक (क्यूआरटी) कार्यरत सुधाकर रावसाहेब पाटील आणि त्यांचे टीम प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर कामठे हे पहाटे ४ वाजता पी. रामचंदानी रोड परिसरात गस्त घालत असताना आकाशात एक संशयास्पद वस्तू उडताना त्यांना दिसली. निरीक्षण केल्यानंतर ती वस्तू ड्रोन असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम राबवली. सिग्नल ट्रॅक करून गेट वे ऑफ इंडियाजवळील जेट्टी क्रमांक ५ शेजार उभ्या केलेल्या एका वाहनापर्यंत पोलीस पोहोचले. या वाहनातील एक तरूण रिमोट कंट्रोल वापरून ड्रोनचा हाताळत होता. त्याला विचारले असता संबंधित ड्रोन त्याचा असल्याचे त्याने कबुल केले, तसेच ड्रोन उडवण्यासाठी त्याने पोलिसांची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे मान्य केले. त्यानंतर त्याला कुलाबा पोलीस ठाण्यात नेण्यात आले, तेथे त्याची माहिती आणि इतर तपशील नोंदवण्यात आले. पोलिसांनी जवळपास ७० हजार रुपये किंमतीचा राखाडी रंगाचा ड्रोन आणि रिमोट कंट्रोल जप्त केला. तरूणाला नोटीस देऊन सोडण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईत विनापरवानगी ड्रोन उडवण्यावर बंदी

मुंबई पोलीस आयुक्तालयाने ५ मे ते ३ जून २०२५ या कालावधीत ड्रोन, मायक्रोलाइट विमान, पॅराग्लायडर आणि हँडग्लायडर वापरण्यावर संपूर्ण बंदी घातली आहे. ही बंदी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ अंतर्गत कलम १६३ नुसार लागू करण्यात आली आहे. आरोपीने या आदेशाचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. यापूर्वी पवई येथेही विनापरवानगी ड्रोन उडवल्याप्रकरणी २३ वर्षीय तरूणाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हील एव्हिएशनने मुंबई शहरात विविध ठिकाणी ड्रोन न उडविण्यासाठी “रेड झोन” म्हणून घोषित केले आहेत. त्यामुळे मुंबई शहरात कोणत्याही व्यक्तीस अधिकृत परवानगीशिवाय ड्रोन उडविण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच या ड्रोन बंदीचे तंतोतंत पालन करावे, आदेशाचे भंग करणाऱ्यावर सक्त कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच कोणतीही व्यक्ती नमूद आदेशाचा भंग करून ड्रोन उडवित असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत तात्काळ मुख्य नियंत्रण कक्षालाच्या माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.