भिवंडी शहरातील ऐश्वर्या बारजवळ अवैधरित्या बंदूक आणि काडतुसं विकण्याचा प्रयत्नात असलेल्या एका तरुणास भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. इसरार अहमद उर्फ सद्दाम अन्सारी (२२) असे या तरूणाचे नाव असून तो अन्सार मोहल्ला येथील राहणारा आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल (अग्निशस्त्र) व एक जिवंत काडतुस पोलिसांनी जप्त केले.
भादवड नाका येथील ऐश्वर्या बारजवळ बंदूक विकण्यासाठी तरुण येणार असल्याची माहिती भिवंडी गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. सोमवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारस इसरार या भागात आला असता पोलिसांनी त्याला हटकले. पळण्याचा प्रयत्न करताना इसरारला दबा धरून बसलेल्या पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर शांतीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडील आजारी असल्याने त्यांनी ही बंदुक विक्रीसाठी दिली होती, अशी माहिती इसरारने पोलिसांना दिली, असे भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. आर. राऊत यांनी दिली.