मुंबईः बोरिवलीमधील गोराई परिसरात पुढे जाण्याच्या प्रयत्नात बेस्ट बस चालकाने दुचाकीला धडक दिली. त्यात २५ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी बेस्ट बस चालकाविरोधात बोरिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याला नोटीस देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.गोराई परिसरातील ‘आकाशवाणी’ समोरील मार्गावर मंगळवारी हा अपघात झाला. आरोपी बेस्ट बसचालक संदेश श्रीकांत सुतार (३२) भारधाव वेगात बस चालवत होता. दुचाकीला ओलांडून जाण्याचा प्रयत्न तो करीत होता. त्यावेळी बेस्ट बसने दुचाकीला पाठीमागून धडक दिली.

या अपघातात दुचाकीस्वार वैभव विजय कांबळे(२५) खाली कोसळला. या अपघातात वैभव गंभीर जखमी झाला. त्याला शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी कांबळेला मृत घोषित केले. याप्रकरणानंतर पोलिसांनी तात्काळ कांबळेची माहिती काढून त्याचे वडील विजय कांबळे यांना अपघाताची माहिती दिली. याप्रकरणी वैभवचे वडील विजय कांबळे यांच्या तक्रारीवरून बोरिवली पोलिसांनी सुतार विरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०६ (१) अंतर्गत निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानंतर सुतारला नोटीस देण्यात आली.

Story img Loader