मुंबई : इंटरनेटवर कॉलगर्ल सेवा शोधणे २३ वर्षीय तरूणाला भलतेच महागात पडले. आरोपींनी पोलीस तक्रारीसह तरूणाला बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांला विविध बँक खात्यात सहा लाख १० हजार रुपये हस्तांतरित करण्यास भाग पाडले. याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी आरोपीविरोधात माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
तक्रारदार तरूण मूळचा तामिळनाडूमधील रहिवाशी असून सध्या वडाळा येथे राहतो. तो महाविद्यालयात शिक्षण घेत असून खासगी कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणूनही काम करतो. तो ४ मे रोजी इंटरनेट सर्च इंजिनवर कॉलगर्स सर्विसचा शोध घेत होता. त्यावेळी त्याला एक संकेतस्थळ सापडले. त्यावर कॉलगर्ल सेवा पुरवली जात असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यावरील मोबाइल क्रमांकावर या तरूणाने संपर्क साधला व कॉलगर्लबाबत चौकशी केली. यावेळी समोरील व्यक्तीने त्याला ५०० रुपये देण्यास सांगितले. त्यामुळे त्याने क्यूआर स्कॅन करून ५०० रुपये हस्तांतरित केले. त्यानंतर तक्रारदार तरूणाला आरोपीने दहा विविध तरूणींची छायाचित्रे पाठवली. त्यातील एका तरूणीची निवड करण्यास आरोपीने सांगितले.
तरूणी चालकासोबत त्याला पाहिजे त्या ठिकाणी येईल, त्यासाठी डिपॉजिट म्हणून तीन हजार रुपये हस्तांतरित करण्यास आरोपीने सांगितले. त्यानंतर तरूणीने पैशांची मागणी केल्याचे सांगून आरोपीने दोन वेळी ३२ हजार ५२० रुपये हस्तांतरित करण्यास सांगितले. तसेच प्रक्रिया शुल्काच्या नावाखाली ५१ हजार ५२० रुपये जमा करण्यास सांगितले. आरोपीने सांगितल्याप्रमाणे तक्रारदाराने रक्कम हस्तांतरित केली.
दुसऱ्या दिवशी या व्यक्तीने पोलीस पडताळीसाठी त्याच्याकडे ९९ हजार ९९९ रुपये, तसेच जीएसटीच्या नावाखाली एक लाख १० हजार रुपये हस्तांतरित करण्यास सांगितले. त्याने ही रक्कम देण्यास नकार दिला. त्यावेळी आरोपीने तक्रारदाराविरोधात पोलिसांकडे तक्रार करून त्याची बदनामीची धमकी दिली. या संपूर्ण प्रकारामुळे तरूण फार घाबरला. त्यानंतर आरोपींनी ततक्रारदार तरूणाला बदनामीची धमकी देऊन ६ ते ९ एप्रिल या काळावधीत सहा लाख १० हजार रुपये विविध बँक खात्यांवर हस्तांतरित करण्यास भाग पाडले. त्यानंतरही वारंवार रकमेची मागणी करण्यात आली. अखेर नेहमीच्या धमकीला कंटाळून तरूणाने याप्रकरणी माटुंगा पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून बँक खात्यांमधील व्यवहाराच्या माध्यमातून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. या संपूर्ण प्रकरणामागे सायबर फसवणूक करणाऱ्या सराईत टोळीचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे.