नौकानयनासाठी गेलेल्या आणि नशेच्या अमलात तलावात उडी मारणाऱ्या एका तरुणाचा मृत्यू घडण्याची घटना मालाड येथे बुधवारी घडली. विशेष म्हणजे नौकेतून उडी मारताना या तरुणाचा तोल गेल्याने नौकाही उलटली. सुदैवाने त्याच्यासह असलेल्या दोघांना वाचवण्यात इतरांना यश आले.
मालाड येथील मार्वे रस्त्यावरील राठोडी गावात असलेल्या लोटस तलावात सैनत अकबर सय्यद हा १७ वर्षांचा तरुण आपल्या दोन मित्रांसह नौकानयनासाठी गेला होता. दुपारच्या वेळीही तो नशेत होता.
 नौका मध्यावर आली असताना अचानक सैनत उभा राहिला आणि त्याने नौकेतून उडी मारली. त्या वेळी डचमळल्याने नौकाही उलटली.
सुदैवाने जवळच असलेल्या लोकांनी त्याच्यासह असलेल्या दोन मित्रांचे जीव वाचवले. सैनतलाही बाहेर काढत तातडीने रुग्णालयात नेले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्याच्या मृत्यू झाल्याचे जाहीर केले.