मुंबई : परदेशातील नोकरीचे आमिष दाखवून देशभरातील अनेक तरुणांची फसवणूक करणाऱ्या यूट्युबरला गुन्हे शाखेने पकडले. आरोपीविरोधात देशभरात चार गुन्हे दाखल असून त्याचा ताबा चारकोप पोलिसांना देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीविरोधात मुंबई, मिरा-भाईंदर, उत्तर प्रदेश व हरियाणा येथे चार गुन्हे दाखल आहेत. होतकरून तरूणांना परदेशात पाठवत असल्याचे व्हिडिओ अपलोड करून त्याने अनेकांची फसवणूक केली असून पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.

संजय विश्वकर्मा (३३) असे आरोपीचे आहे. संजय त्याच्या अन्य साथीदारांसह यूट्यूबवर व्हिसा एक्स्पर्ट मॅनपाॅवर नावाने यूट्यूब चॅनेल चालवत होता. परदेशात चांगल्या पगाराच्या नोकरीसंदर्भातील संपर्कासाठी दोन क्रमांक दिले होते. त्या क्रमांकांवर गरजूंनी संपर्क साधल्यावर आरोपी संबंधितांना हेरून त्यांची फसवणूक करीत होता.

मोहम्मद हसन गुलाम रसुल यांना, तसेच त्यांचा मुलगा आसिफ, जावई मुनावर शेख यांना वर्क व्हिजावर परदेशात नोकरीसाठी पाठविण्याचे आश्वासन देऊन संजय विश्वकर्मा व अब्दुल्ला हुसेन आलम शेख यांनी चार लाख नऊ रुपयांची फसवणूक केली होती. त्यामुळे रसूल यांच्या तक्रारीवरून चारकोप पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखा कक्ष-५ च्या पथकाने या प्रकरणात प्रथम अब्दुल्लाला पकडले आणि चारकोप पोलिसांच्या ताब्यात दिले.

त्याप्रकरणातील मुख्य आरोपी संजय पोलिसांच्या हाती लागला नव्हता. अखेर गुन्हे शाखेच्या कक्ष ५ चे प्रभारी निरीक्षक घनशाम नायर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप जाधव, तानाजी पाटील, भाऊसो पवार यांनी तांत्रिक व मानवी कौशल्याच्या आधारे पोलिसांनी विश्वकर्माला वसईमधील नायगाव येथून पकडले. त्याला पुढील तपासासाठी चारकोप पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

आरोपी बनावट नावाने या यूट्यूबवर यायचा. तसेच यूट्यूब चॅनेलवर विविध मोबाइल क्रमांक देऊन लोकांची फसवणूक करायचा. त्याच्या या यूट्यूब चॅनेलवर सहा हजार फॉलोअर्स आहेत. गंभीर बाब म्हणजे आरोपी परदेशात तरूणांना पाठवताना त्यांचे चित्रीकरण करायचा. त्यामुळे अनेकांचा त्याच्यावर विश्वास बसला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय विश्वकर्मा याच्या विरोधात भाईंदर येथील नवघर, राजस्थानातील सदर नागौर पोलीस ठाणे आणि हरियाणातील सदर पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल असून त्यांची उकल करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. तसेच आरोपीने विविध राज्यातील १५ हून अधिक बेरोजगारांना परदेशातील नोकरीचे आमिष दाखवून फसविल्याच समजते. त्याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.