Imran Khan Zane Khan OCI Card Mumbai Police: अभिनेता इम्रान खानने एसआयआरविरोधातील मुंबईतील आंदोलनात सहभाग घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात विनाअट माफी मागितली आणि भविष्यात अशी चूक पुन्हा करणार नसल्याचे हमी पत्र देण्यास न्यायालयाने बजावले. यानंतर आता मुंबई पोलिसांनी परदेशी क्षेत्रीय नोंदणी कार्यालयाला (फॉरेनर्स रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिस) पत्र लिहून इम्रान खानबरोबर आंदोलनात सहभागी झालेली त्याची चुलत बहीण आणि अभिनेत्री झैन मरी खानच्या ‘ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया’ (ओसीआय) दर्जाची पडताळणी करण्यास सांगितले.

१० ऑक्टोबर रोजी मुंबईत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलनात झैन मरी खान तिचा भाऊ इम्रान खानसह सहभागी झाली होती. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांच्या विरोधात एफआयआर दाखल केला होता. महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी ‘हम भारत के लोग’ या नावाने आयोजित केलेल्या आंदोलनात हे दोघे सामील झाले होते. मुंबईतील नाना चौकातून दोघांना ताब्यात घेऊन नंतर सोडण्यात आले.

इम्रान खान आणि झैन मरी खानला ताब्यात घेतल्यानंतर मुंबई पोलिसांच्या दक्षिण विभागाने फॉरेनर्स रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिसला पत्र लिहून दोघांच्याही ओसीआय दर्जाची पडताळणी करण्यास सांगितले होते.

एका वरीष्ठ पोलिसाने द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, प्रक्रियेचा भाग म्हणून पोलिसांनी एफआरआरओला दोघांच्याही ओसीआय दर्जाची सद्यस्थिती जाहीर करण्याबाबत पत्र लिहिले.

१४ ऑक्टोबर रोजी एफआरआरओने इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस दिली होती. दोन दिवसानंतर मुंबई पोलिसांनी एफआरआरओला दुसरे पत्र पाठवून झैन मरी खानही ओसीआय कार्डधारक असून तिच्या स्थितीची माहिती मागितली होती.

ओसीआय कार्डधारकांना आंदोलनात सहभागी होण्याचा अधिकार नसल्याचे सांगत २ नोव्हेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने इम्रान खानला फटकारले होते. तसेच त्याने विनाअट माफी मागावी, असे आदेश दिले. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, झैन मरी खानचा जन्म मुंबईत झाला असला तरी ती ओसीआय कार्डधारक आहे.

इम्रान खानच्या वकिलांनी द इंडियन एक्सप्रेसला माहिती देताना सांगितले की, झैनला एफआरआरओची नोटीस प्राप्त झालेली नाही.

इन्स्टाग्रामवरील व्हिडीओ केला डिलीट

मुंबईत आंदोलन केल्याप्रकरणी झैन मरी खान, इम्रान खान यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांशी झालेल्या झटापटीत आपल्याला दुखापत झाली असल्याचा दावा झैन मरी खानने केला होता. याबद्दल तिने इन्स्टाग्रामवर शरीरावरील जखमा दाखवणारा व्हिडीओही शेअर केला होता. मात्र कालांतराने तिने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरून हटवला.

‘कुणाला इतकेही घाबरवू नका की, त्याच्यातील भीतीच संपून जाईल’, असे कॅप्शन तिने या व्हिडीओला दिले होते.