मुंबई : ग्राहकाच्या मागणीनुसार सोन्याचे दागिने बनवून विकणाऱ्या झवेरी बाजारातील एका सराफाला दोन सराफांनीच दोन कोटी रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार गोवंडीमध्ये घडला. याबाबत शिवाजी नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका आरोपीला अटक केली. अन्य एका आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. तक्रारदार अजित जैन यांचा सोन्याचे दागिने विक्री करण्याचा घाऊक व्यवसाय असून त्यांचे झवेरी बाजार येथे कार्यालय आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांच्याच ओळखीच्या इसम मनीष जैन याने अजित जैन यांच्याकडून मोठ्या प्रमाणात सोने घेतले होते.
तोही सोन्याचा व्यापारी असून त्याने इतर दुकानदारांना हे सोने विकून सर्व व्यवहार पूर्ण केले. मात्र, दोन वर्षांपूर्वी त्याने विविध दुकानदारांना सोन्याचे दागिने देण्याच्या बहाण्याने १ कोटी ८५ लाख रुपये किमतीचे सोने अजित यांच्याकडून घेतले होते. मात्र अनेक दिवस उलटल्यानंतरही त्याने हे पैसे परत केले नाहीत.
अजित जैन यांनी याबाबत अनेकदा फोन करून मनीषला पैसे परत करण्याची विनंती केली. मात्र तो नेहमीच उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने अजित जैन यांनी याबाबत शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार शिवाजी नगर पोलिसांनी मनीष जैन व त्याच्या अन्य एक साथीदाराविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर मनीषला अटक केली. या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
