काहीशा गूढ वातावरणातली आणि कोकणाच्या परंपरेला साजेशी एक अतिशय रंजक गोष्ट ‘तुंबाडची मंजुळा’ या नवीन चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आणणार असल्याची घोषणा झी स्टुडिओजने केली आहे. होळीच्या दिवशी समाज माध्यमांवरून या चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. एका घराच्या अर्धवट बंद दाराआड दिसणारा एक गूढ चेहरा आणि दोन्ही कवाडांच्यामध्ये अडकलेले काही हात… जणू काही घरातून बाहेर पडायचा ते प्रयत्न करत आहेत हे सांगण्याचा प्रयत्न पोस्टरमधून दिसतो आहे. येत्या ५ जून रोजी म्हणजेच जागतिक पर्यावरण दिनी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या या चित्रपटाद्वारे विविध कोरगावकर या नव्या दमाच्या दिग्दर्शकाचे पदार्पण होणार आहे. या नव्या चित्रपटाबद्दल बोलतांना झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवेलकर म्हणाले,‘मराठी प्रेक्षक हा एकाच वेळी जेवढा आधुनिक विचारसरणीचा असतो तेवढाच तो आपल्या मातीशी, आपल्या मुळांशी जोडलेला असतो. यामुळेच आजच्या काळातही आपल्या गावच्या मातीची, तेथील परंपरेची गोष्ट सांगणारा विषय त्याला कायमच भावतो. मागील वर्षी आम्ही आणलेला ‘दशावतार’ हा चित्रपट याचं उत्तम उदाहरण.

‘तुंबाडची मंजुळा’ हा देखील असाच गावाकडचा एक वेगळा अनुभव देणारा चित्रपट ठरणार आहे’. पहिल्या पोस्टरपासूनच समाज माध्यमांवर चर्चेचा विषय झालेला ‘तुंबाडची मंजुळा’ हा चित्रपट येत्या ५ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.