मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) मुंबई अध्यक्षपदी विधान परिषद आमदार झिशान सिद्दीकी यांच्या निवडीमुळे नाराज झालेले पक्षाचे मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कांबळे यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. समीर भुजबळ यांना विधानसभा निवडणुकीत पक्षाने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून मुंबई अध्यक्ष पद रिक्त होते. सिद्धार्थ कांबळे हे कार्याध्यक्ष या नात्याने पक्षाचे मुंबईतील काम पाहत होते. आपल्याला अजित पवार यांनी मुंबई अध्यक्षपदी नियुक्त करण्याचा शब्द दिला होता, असा कांबळे यांचा दावा आहे.
कांबळे हे मुंबईत पक्षाचा दलित चेहरा आहेत. कांबळे यांनी अध्यक्षपदाच्या निवडीबद्दलची खदखद समाजमाध्यमावर व्यक्त केली आहे. कांबळे हे मुंबै जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष आहेत. झिशान सिद्दीकी यांची मुंबई अध्यक्षपदी निवड करताना मुंबईतील सहा जिल्हाध्यक्ष आणि दोन्ही कार्याध्यक्षांना पक्ष नेतृत्वाने विश्वासात घेतले नसल्याची भावना आहे.
राष्ट्रवादीने काल राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते म्हणून उमेश पाटील आणि मुंबई अध्यक्ष म्हणून झिशान सिद्दीकी यांच्या निवडी घोषित केल्या. उमेश पाटील यांच्या निवडीलाही दिल्लीचे राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते बृजमोहन श्रीवास्तव यांनी आव्हान दिले आहे. या दोन्ही निवडी वादात सापडल्याने राष्ट्रवादी नेतृत्वाची एकप्रकारे कोंडी झाली आहे.
काय म्हणाले सिद्धार्थ कांबळे?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून आदरणीय अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली 27 वर्षे काम करता आले. या प्रदीर्घ प्रवासात दादांनी एक दलित चेहरा व सहकारातील माझे काम पाहून वेळोवेळी ताकद दिली. दुर्दैवाने 9 महिन्यांपूर्वी दादांचे निधन झाले आणि तेव्हापासून आम्हाला खऱ्या अर्थाने पोरकेपणाची जाणीव होत आहे. सुनेत्रा वहिनींनी घेतलेल्या निर्णयाचा मी मनापासून आदर करतो. मात्र, बऱ्याच विचारांती मी माझ्यावर सोपवण्यात आलेल्या मुंबई कार्याध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
