Zeeshan Siddiqui : मुंबईतील काँग्रेसचे मोठे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर सिद्दीकी यांनी अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये काँग्रेसच्या तीन मोठ्या नेत्यांनी पक्षाला रामराम करत भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांमध्ये प्रवेश केला आहे. सिद्दीकी यांच्यासह माजी खासदार मिलींद देवरा (शिवसेनेचा शिंदे गट) आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (भारतीय जनता पार्टी) यांनीदेखील काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
दरम्यान, बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्ष सोडला असला तरी त्यांचे पूत्र आमदार झिशान सिद्दीकी हे अद्याप काँग्रेसमध्येच आहेत. “माझा काँग्रेस सोडण्याचा विचार नाही”, असं सिद्दीकी यांनी स्पष्ट केलं आहे. अशातच काँग्रेसने झिशान सिद्दीकी यांची मुबई युथ काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी केली आहे. काँग्रेस नेतृत्वाने झिशान सिद्दीकी यांच्याऐवजी मुंबईतील काँग्रेसचे युवा नेते अखिलेश यादव यांची मुंबई युथ काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
झिशान सिद्दीकी हे मुंबईतल्या वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. तर त्यांचे वडील बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेसमधील मोठे नेते होते. मुंबईतला काँग्रेसचा अल्पसंख्याक चेहरा म्हणून त्यांना पक्षात मोठं स्थान होतं. परंतु, बाबा सिद्दीकी यांनी आता अजित पवार गटात प्रवेश केला आहे. काँग्रेस पक्ष सोडताना बाबा सिद्दीकी म्हणाले होते, कधी कधी काही गोष्टी आपल्याला पटत नाहीत. त्यामुळे जाऊदेत त्या गोष्टी झाल्या आहेत. मी दीर्घकाळ काँग्रेसमध्ये होतो. पण मी हा निर्णय अचानक घेतलेला नाही. माझा नाईलाज झाल्यामुळे पक्ष सोडण्याशिवाय माझ्याकडे पर्याय उरला नाही. गोष्टी बरोबर घडल्या नाहीत की आपण बाजूला झालेलं बरं म्हणून मी बाजूला झालो.
हे ही वाचा >> विश्लेषण : मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार का? कोणते मुद्दे उपस्थित होऊ शकतात?
मुस्लीमबहुल वांद्रे पश्चिम हा बाबा सिद्दीकी यांचा मतदारसंघ होता. पक्षाचा कार्यकर्ता, पदाधिकारी ते आमदार, राज्यमंत्री असा त्यांचा प्रवास राहिला आहे. १९९९, २००४ व २००९ मध्ये असे सलग तीन वेळा ते विधानसभेवर निवडून आले होते. २००४ ते २००८ या कालावधीत ते काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री होते. परंतु, २०१४ च्या मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला. २०१९ मध्ये त्यांनी निवडणूक लढवली नाही, परंतु त्यांनी त्यांचे पूत्र झिशान सिद्दीकी यांना मतदंरसंघ बदलून वांद्रे पूर्वमधून निवडून आणलं होतं. बाबा सिद्दीकींपाठोपाठ झिशान सिद्दीकीदेखील अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. विधानसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत ते काँग्रेसमध्येच राहू शकतात.