मुंबई: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याची मागणी करण्यात येत आहे. या मागणीसाठी ईव्हीएम विराेधात थेट राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात आंदोलन पुकारण्यात आले. चार जणांनी राज्य निवडणूक कार्यालयात घुसून ‘जिल्हा परिषद निवडणुका मतपत्रिकेवर घ्या’ अशी मागणी करण्यात आली. या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
विधानसभांपाठोपाठ नगरपालिका आणि महापालिका निवडणुकांत भाजपला मिळालेल्या प्रचंड यशामुळे पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित होऊ लागला आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाकडे जिल्हा परिषद निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यानी थेट राज्य निवडणूक कार्यालयात घुसून आंदोलन केले. ईव्हीएम हटाव, देश बचाव, अशा घोषणा कार्यालयात देण्यात आल्याने काही काळ तिथे उपस्थित कर्मचाऱ्यांमध्ये गाेंधळ उडाला. प्रतिष्ठानच्या महिला अध्यक्षा राजश्री उंबरे पाटील यांच्यासह अन्य सहकाऱ्यांनी हे आंदोलन केले.
ईव्हीएमवर बंदी घाला, सत्ताधारी ईव्हीएमचा वापर करून निवडणूक जिंकत आहेत. निवडणूक आयोग आमच्या तक्रारींची दखल घेत नाही, असा आरोप यावेळी कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. घोषणाबाजीनंतर पोलीसांनी धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानच्या ४ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. हे कार्यकर्ते धाराशिव येथून आल्याचे सांगण्यात आले.
