मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत तरुण पिढीचा चेहरा म्हणून ओळखले जाणारे हाताच्या बोटांवर मोजण्याइतके चित्रपटकर्मी आहेत. त्यात लेखिका, निर्माती, दिग्दर्शिका अशा विविध भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर नवनव्या कलाकृती आणणार्या झोया अख्तर यांचे नाव अग्रेसर आहे. धारावीतील मुरादपासून ते ‘आर्ची कॉमिक्स’च्या कथाविश्वातील तरुणाईची काल्पनिक गोष्ट सांगण्यात रमणार्या झोया अख्तर यांच्या सर्जनशीलतेचा प्रवास ‘लोकसत्ता गप्पा’च्या नव्या पर्वात उलगडला जाईल.
प्रतिभावंतांच्या परिचित प्रतिमेपलीकडे त्यांचे व्यक्तित्व, त्यांचा कलाक्षेत्रातील संघर्ष, त्यांच्या धारणा, अनुभवांचे संचित याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न ‘लोकसत्ता गप्पा’ या कार्यक्रमातून केला जातो. गप्पांच्या या नव्या पर्वात ‘लक बाय चान्स’ या चित्रपटापासून दिग्दर्शक म्हणून कारकीर्दीची सुरुवात करणार्या आणि ‘जिंदगी मिलेगी ना दोबारा’, ‘दिल धडकने दो’, ‘गल्लीबॉय’सारखे यशस्वी चित्रपट देणार्या झोया अख्तर यांच्याशी संवादाचा योग जुळून आला आहे. ‘लोकसत्ता गप्पा’ कार्यक्रमात तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या झोया अख्तर यांच्याशी प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सुभाष संवाद साधणार आहेत.
चित्रपट कलेतच रमलेल्या कुटुंबात झोयाचा जन्म झाला. वडील प्रसिद्ध गीतकार-पटकथाकार जावेद अख्तर, तर आई हनी इराणी याही उत्तम लेखिका. त्यामुळे लेखनाचा आणि एकूणच चित्रपटाचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला. ‘मी अत्यंत स्वतंत्र विचार असलेल्या आई – वडिलांच्या तालमीत वाढले. लहानपणापासूनच चित्रपटसृष्टीतील थोरामोठ्यांचा सहवास आम्हाला लाभला. नामांकित शाळा, महाविद्यालयातून शिक्षण घेतले. त्यामुळे सगळ्याच अर्थाने समृद्ध, संपन्न अशा वातावरणात मी वाढले’ असे सांगताना त्याचा प्रभाव आपल्या चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेवर निश्चितच पडला आहे’ असे झोया ठामपणे सांगतात. त्यामुळे एकीकडे त्यांचे चित्रपट हे मोठ्या प्रमाणात शहरी, उच्चभ्रू वर्गाचे प्रतिनिधित्व करणारे आहेत, अशी चर्चा होते.
पण, लोकांना तेच चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात आणि म्हणूनच त्यांच्या सिक्वेलपटांचीही मागणी होते आहे हा गमतीशीर विरोधाभास असल्याचे त्या सांगतात. या कुठल्याही चर्चेत अडकून पडण्यापेक्षा आपल्या पद्धतीने सातत्याने नव्या चित्रपटांच्या निर्मितीत किंवा उत्तम चित्रपटांच्या पाठीशी उभे राहात त्यांना प्रेक्षकांपर्यंत आणण्यात झोया रमलेल्या दिसतात. वैचारिकदृष्ट्या समृद्ध अशा वातावरणात लहानाचे मोठे झालेल्या झोया यांची जडणघडण, दिग्दर्शिका म्हणून त्यांचा आजवरचा प्रवास असे विविध अनुभव ऐकण्याची संधी ‘लोकसत्ता गप्पां’मधून मिळणार आहे.
