मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत पटकथा लेखिका, दिग्दर्शिका, निर्माती अशी स्वत:ची बहुपेडी ओळख निर्माण करणार्‍या प्रतिभासंपन्न दिग्दर्शिका झोया अख्तर यांच्याशी त्यांच्या कलाप्रवासाविषयी संवाद साधण्याचा योग जुळून आला आहे. ‘लोकसत्ता गप्पा’ या कार्यक्रमातून झोया अख्तर यांचा कलाप्रवास समजून घेण्याची संधी लाभणार आहे.

जात-धर्म-भाषा-स्तर सगळे भेदाभेद मोडू पाहणार्‍याच्या काळजाला भिडणारे कथामाध्यम म्हणजे चित्रपट. आपल्या भवतालातील अनेक कौटुंबिक-सामाजिक घटना आणि त्या हरतर्‍हेच्या घटनांच्या मंथनातून घडत जाणार्‍या व्यक्तींची गोष्ट सांगण्याचा प्रयत्न दिग्दर्शिका झोया अख्तर यांनी आपल्या चित्रपटांमधून केला. ‘लोकसत्ता गप्पा’ या कार्यक्रमातून त्यांच्या सर्जनशीलतेचा प्रवास उलगडण्यात येणार आहे.

मराठी-हिंदी चित्रपट आणि रंगभूमीवरून तितकेच वैविध्यपूर्ण काम करणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता सुभाष ‘लोकसत्ता गप्पां’च्या मंचावर झोया अख्तर यांना वेगवेगळ्या विषयांवर बोलते करणार आहे. झोया अख्तर यांनी २००७ मध्ये ‘हनीमून ट्रॅव्हल्स प्रा. लिमिटेड’ या चित्रपटाची निर्मिती करत कारकिर्दीची सुरुवात केली. न्यूयॉर्क विद्यापीठातून चित्रपटनिर्मितीचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर २००९ मध्ये झोया अख्तर यांनी ‘लक बाय चान्स’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले.

प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर आणि अभिनेत्री-लेखिका हनी इराणी यांच्या पोटी जन्मलेल्या झोया अख्तर यांना लेखनाचा वारसा घरातूनच मिळाला आणि चित्रपटाचे बाळकडूही लहानपणापासूनच त्यांना मिळाले. चित्रपट माध्यमाशी झालेली ही तोंडओळख पुढे प्रत्यक्ष कामातून वाढवत नेत स्वतंत्रपणे दिग्दर्शिका म्हणून सुरुवात करण्याइतकी घट्ट होत गेली. झोया अख्तर यांच्या कलासंवेदना, अनुभवाची शिदोरी असे बरेच काही या गप्पांमधून उलगडणार आहे.